esakal | ‘मोरया’च्या जयघोषात बाप्पांचे आगमन, अमाप उत्साहाच्या जल्लोषात गणरायाला घरी आणले
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजी: ‘मोरया’च्या जयघोषात बाप्पांचे आगमन

इचलकरंजी: ‘मोरया’च्या जयघोषात बाप्पांचे आगमन

sakal_logo
By
टीम ई सकाळ

इचलकरंजी : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ अशा विविध घोषणांनी वातावरण भारुन टाकत, गणेशभक्तांच्या अभूतपूर्व उत्साहात विघ्नहर्ता गणपती बाप्पांचे घराघरात आगमन झाले. कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापणा केली. पारंपारिक वाद्यांसह वेशभूषेचा साज यंदा गणेशोत्सवात दिसून आला.

हेही वाचा: कोल्हापुरात राजघराण्याच्या गणेशाचे शाही लवाजम्यासह आगमन

पारंपारिक वेशभुषेच्या पेहरावात गणेशोत्सव चांगलाच मंगलमय बनून गेला. गल्लोगल्ली हालगी, ताशा, ढोल वाद्यांचा ताल धरत प्रचंड जयघोषात बाप्पाचे आगमन केले जात होते. कुणी ढकलगाडीतून, कुणी बाईकवरून तर अनेकांनी सहकुटुंब बाप्पाचे आगमन घरी केले. विविध रूपातील गणेश मुर्तीबरोबर जशाचतशा वेशभुषेत तरूणाई दिसली.

मुख्य मार्गावर दिवसभर नागरिकांची वर्दळ राहिली. शहरात विविध ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता. दरम्यान पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी शहरात गणेशोत्सवानिमित्त विविध ठिकाणी पाहणी केली. दुपारनंतर गणेश मंडळाची लगबग वाढली होती.

अनेकांनी जोपासली मोफत सेवा

दरवर्षी रिक्षावाले, काही चार चाकी वाहन मालक शहरात घरगुती बाप्पाचे आगमनासाठी निरपेक्ष कार्य करत असतात. काहीजण गेल्या सहा वर्षापासून ही सेवा करत आहेत. यावर्षी अनेकांनी ही मोफत सेवा जोपासली. शहरातील प्रमुख चौक मार्गावर ठिकठिकाणी मोफत सेवेचा फलक लावून काही मंडळी सेवा देत होते.

घुणकी परिसर

घुणकी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किणी, घुणकी, चावरे, तळसंदे, नवेपारगांव, जुने पारगांव, निलेवाडी, पाडळी, मनपाडळे, अंबप,वाठार परीसरात आज सकाळी कुंभारवाड्यातून अबालवृध्दांनी विधीवत गणरायाची घरी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात प्रतिष्ठापना केली.

कुंभोज परिसर

कुंभोज : येथील सुमारे चाळीसहून अधिक सार्वजनिक मंडळाचे तर सुमार पाच हजारहून अधिक घरगुती गणपतीची विधीवत प्रतिष्ठापना केली. सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचे सावट असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळांनी शासकीय नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा केला. सकाळपासून घरगुती मुर्तीसाठी ग्रामस्थांनी कुंभारवाड्यात धाव घेतली होती. कुंभार बांधवांनी गर्दी न करता कोरोना नियमांचे पालन करीत भाविकांना मुर्ती दिल्या.

जयसिंगपूरमध्ये खरेदीस गर्दी

जयसिंगपूर : 'गणपती बाप्पा मोरया' च्या गजरात शुक्रवारी (ता.१०) शहरात गणरायाचे उत्साहात आगमन झाले. पहाटेपासूनच तरुण मंडळाची 'श्रीं'च्या मूर्ती प्रतिष्ठापनेची धांदल सुरू झाली. सायंकाळपर्यंत घरगुती गणेशमूर्तींच्या प्रतिष्ठापना केली जात होती. शहरातील मंडळांनी साधेपणाने प्रतिष्ठापना केल्याने याही वर्षी सजविलेल्या वाहनातून गणरायाचे स्वागत झाले नाही. उसत्वाच्या पार्श्वभूमीवर खरदेसाठी बाजारात गर्दी झाली.

कुरुंदवाड परिसर

कुरुंदवाड : शहर व परिसरातील गावांत लाडक्या गणरायाचे स्वागत केले. अत्यंत उत्साहात आज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाबरोबरच घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. घरोघरी सकाळपासून श्री गणेशाच्या प्रतिष्ठापनेची जय्यत तयारी सुरू होती.

पूजासाहित्य, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांमध्ये उत्साह होता. शहरातील नगरपरिषद चौक, कुंभारवाडा, गणपती मंदिर, विठ्ठल मंदिर या ठिकाणी गणेश मूर्ती नेण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती. शहरात आज गणेशाच्या पूजेसाठी व स्वागताच्या साहित्य खरेदीसाठी लाखो रुपयांची उलाढाल झाली.

loading image
go to top