Kolhapur : शहरात पर्यटकांचा ओघ कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Kolhapur

शहरात पर्यटकांचा ओघ कायम

कोल्हापूर : दिवाळीनंतरच्या पर्यटन हंगामाला आता जोरदार प्रारंभ झाला आहे. शुक्रवार ते रविवार आणि सलग सुट्ट्यांची पर्वणी साधत पर्यटक मोठ्या संख्येने शहरात येत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणांहून बसेसचे जथ्थेही पर्यटकांना घेऊन येत आहेत. दरम्यान, आज दिवसभर शहरातील बिंदू चौक पार्किंग फुल्ल राहिले. श्री अंबाबाई मंदिराला जोडणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर सकाळी व सायंकाळनंतर वाहतुकीची कोंडी राहिली.

श्री अंबाबाई मंदिराबरोबरच रंकाळा, जोतिबा, पन्हाळा, कणेरी मठ झाल्यानंतर अनेकांची पावलं राधानगरी, दाजीपूर आणि गगनबावड्याकडे वळू लागली आहेत. सहकुटुंब पर्यटक येत असल्याने खरेदीलाही मोठे उधाण आले आहे. त्याशिवाय शहरातील महालक्ष्मी धर्मशाळेबरोबरच यात्री निवास, हॉटेल्सही फुल्ल झाली आहेत. शुक्रवार ते रविवार या दरम्यान श्री महालक्ष्मी अन्नछत्रामध्ये साडेतीन ते चार हजार भाविक मोफत अन्नछत्राचा लाभ घेत असून, धर्मशाळाही फुल्ल असल्याचे अन्नछत्राचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी सांगितले. चप्पल लाईनबरोबरच अंबाबाई मंदिर परिसरातील विक्रेत्यांचीही उलाढाल वाढली असून, प्रदीर्घ काळानंतर त्यांना आता या माध्यमातून आर्थिक आधार मिळू लागला आहे. कोल्हापुरी चपलांना पर्यटकांची मोठी मागणी आहे. तब्बल दीड वर्षाने पर्यटकांचा मोठा प्रतिसाद आता मिळू लागला असल्याचे चप्पल व्यावसायिक महादेव ऱ्हाटणकर यांनी सांगितले.

loading image
go to top