
हुपरी पालिकेच्या नगरसेवकपदी तृतीयपंथी तातोबा हांडे यांची निवड
हुपरी - येथील पालिकेच्या आज शुक्रवारी (ता. २२) झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत स्वीकृत नगरसेवक पदी तातोबा बाबूराव हांडे उर्फ देव आई यांची निवड झाली. हांडे यांच्या रूपाने पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सभागृहात पहिल्यांदाच तृतीयपंथियास प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे. या ऐतिहासिक घटनेचे स्वागत होत आहे.
आमदार प्रकाश आवाडे प्रणित ताराराणी जिल्हा विकास आघाडीच्या कोट्यातून तातोबा हांडे यांना संधी मिळाली आहे. निवडीनंतर आवाडे समर्थक कार्यकर्त्यांसह तृतीयपंथिय व रेणुका भक्तांनी वाद्यांच्या गजरात गुलाल उधळून तसेच फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.
ताराराणीचे या आधीचे स्वीकृत नगरसेवक प्रकाश बावचे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदाच्या निवडीसाठी नगराध्यक्षा सौ. जयश्री गाट यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. यावेळी उपनगराध्यक्ष सुप्रिया पालकर, सभा अधिकारी जानबा कांबळे, ताराराणीचे पक्ष प्रतोद सूरज बेडगे, भाजपचे रफिक मुल्ला, अंबाबाई विकास आघाडीचे दौलतराव पाटील, शिवसेनेचे बाळासाहेब मुधाळे आदींसह नगरसेवक उपस्थित होते. निवडीनंतर नगराध्यक्षा सौ. गाट तसेच जिल्हा परिषद सदस्य राहूल आवाडे आदींनी नवनिर्वाचित नगरसेवक तातोबा हांडे यांचा सत्कार केला. यावेळी तृतीयपंथियांची उपस्थिती लक्षणीय होती.
पराभूत नव्हे तर छाननीत बाद...
तातोबा हांडे उर्फ देव आई रेणुका भक्त म्हणून ओळखले जातात. परिसरात त्यांचा मोठा भक्तगण आहे. त्यांनी पालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी ताराराणीतर्फे प्रभाग क्रमांक तीन मधून उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, प्रतिस्पर्धी उमेदवाराने हरकत घेतल्याने छाननी वेळी त्यांचा अर्ज अवैध ठरला होता. त्यामुळे त्यांची नगरसेवक पदाची संधी हुकली होती. ताराराणीच्या वरिष्ठ नेत्यांनी तातोबा हांडे यांना नगरसेवक पदी संधी देण्याचा शब्द दिला होता. तो आज तातोबा हांडे यांच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या रूपाने पुर्ण झाला.