esakal | चंदगडमधील तीस टक्के काजू झाडे मृत
sakal

बोलून बातमी शोधा

Thirty Percent Of Cashew Trees In Chandgad Are Dead Kolhapur Marathi News

चंदगड : तालुक्‍यात दोन वर्षापासून काजूच्या रोपांवर अज्ञात रोग पडत आहे. विशेषतः पावसाळ्यात हे प्रमाण वाढत असून त्यामुळे सुरवातीला रोपांची पाने वाळतात.

चंदगडमधील तीस टक्के काजू झाडे मृत

sakal_logo
By
सुनील कोंडुसकर

चंदगड : तालुक्‍यात दोन वर्षापासून काजूच्या रोपांवर अज्ञात रोग पडत आहे. विशेषतः पावसाळ्यात हे प्रमाण वाढत असून त्यामुळे सुरवातीला रोपांची पाने वाळतात. त्यानंतर फांद्या वाळून रोप मृत होत आहे. सुमारे तीस टक्के झाडे या रोगाला बळी पडत असल्याने कष्टाने लागवड केलेली झाडे मरताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे रहात आहेत. 

कोकण आणि कर्नाटक सीमेवरील या तालुक्‍याचे हवामान काजू पिकासाठी पोषक आहे. अलीकडच्या काळात काजू प्रक्रिया उद्योगांमुळे काजूला मागणी वाढली आहे. दरही चांगला मिळत आहे. कमी कष्टात आणि श्रमात आर्थिक प्राप्ती होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात काजूची लागवड केली आहे. शासनाच्या फळबाग योजनेतून वेंगुर्ला जातीची संकरित रोपे लागवड करण्यात आली आहेत.

शासनाकडून अनुदान मिळत असले तरी त्यासाठी शेतकऱ्यांनी कष्ट घेतले आहे. परंतु गेल्या दोन वर्षापासून या रोपांवर अज्ञात रोग पडत आहे. यात ही झाडे वाळून मृत होत आहेत. सुमारे तीस टक्के एवढे मृत रोपांचे प्रमाण असल्याने अनेक शेतकऱ्यांनी लागवड केलेली झाडे दोन वर्षात नष्ट झाली आहेत. भविष्यात या झाडांपासून चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे. या संदर्भात तालुका कृषी खात्याने अभ्यास करून रोग प्रतिबंधक उपाययोजना सुचवण्याची गरज आहे. 

मुबलक उत्पादन देणारी झाडे भुईसपाट 
दरम्यान, संकरित रोपांबरोबरच पंचवीस, तीस वर्षांपूर्वी लागवड केलेली गावठी झाडे सुद्धा अचानकपणे वाळून येत आहेत. अशा झाडांवर खोड किड्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. मोठा विस्तार असलेली आणि मुबलक उत्पादन देणारी ही झाडे रोगाने भुईसपाट होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. पर्यावरणाचीही हानी होत आहे. याबाबत ठोस उपाययोजना अमलात आणावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. 

बाग नष्ट होण्याची शक्‍यता
तीन वर्षापूर्वी दोन एकरात वेंगुर्ला चार व सात या जातीची संकरित रोपांची लागवड केली. उन्हाळ्यात रोपांना पाणी देऊन जगवले. झाडेही चांगली झाली. परंतु गत वर्षापासून अज्ञात रोगांमुळे दरवर्षी सुमारे तीस टक्के रोपे मृत होत आहेत. रोगावर प्रतिबंधात्मक उपाय न केल्यास सर्व बाग नष्ट होण्याची शक्‍यता आहे. 
- बाळकृष्ण पाटील, काजू उत्पादक शेतकरी, हंबीरे  

संपादन - सचिन चराटी

 
 

loading image