esakal | "मोडी'च्या मूडमध्ये हजार जण !

बोलून बातमी शोधा

Thousand People Learn  Online Modi Lipi Kolhapur Marathi News

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सारे काही ठप्प झाले आहे. पण, या आपत्तीलाच इष्टापत्ती मानत येथील एका प्राध्यापकाने मोडी लिपीचा मोफत ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्याच्या पहिल्या बॅचचा निकाल लागला असून, आता दुसऱ्या बॅचची शिकवणी सुरू झाली आहे. तब्बल एक हजार 21 जण मोडी शिकण्याच्या मूडमध्ये आहेत. यानिमित्ताने लोप पावत असलेल्या मराठी भाषेतील मोडी लिपीचे धडे गिरवले जात आहेत. 

"मोडी'च्या मूडमध्ये हजार जण !
sakal_logo
By
अवधूत पाटील

गडहिंग्लज : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सारे काही ठप्प झाले आहे. पण, या आपत्तीलाच इष्टापत्ती मानत येथील एका प्राध्यापकाने मोडी लिपीचा मोफत ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्याच्या पहिल्या बॅचचा निकाल लागला असून, आता दुसऱ्या बॅचची शिकवणी सुरू झाली आहे. तब्बल एक हजार 21 जण मोडी शिकण्याच्या मूडमध्ये आहेत. यानिमित्ताने लोप पावत असलेल्या मराठी भाषेतील मोडी लिपीचे धडे गिरवले जात आहेत. 

येथील डॉ. घाळी महाविद्यालयाकडील मराठीचे प्राध्यापक नीलेश शेळके. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाविद्यालयीन कामकाज बंद केल्याने त्यांनाही घरीच थांबणे अपरिहार्य बनले. सुरवातीचे आठ-दहा दिवस वाचनात घालविले. मात्र, लॉकडाउन सुरू झाल्यामुळे लोकांना नवे काहीतरी देण्याचा त्यांनी विचार केला. त्यातून मोडी लिपिच्या अभ्यासक्रमाचे व्हिडिओ, त्यावर आधारित प्रश्‍नपत्रिका तयार केली. यासाठी प्रा. महेश वंडकर यांचे सहकार्य मिळाले. 

मोडी लिपिचा सात दिवसांचा अभ्यासक्रम आहे. दररोज सकाळी सातपूर्वी एक व्हिडिओ पाठविला जातो. दिवसभरात सोयीनुसार अभ्यास करायचा आहे. आठव्या दिवशी परीक्षेचे नियोजन आहे. ऑनलाईन प्रवेशासाठी व्हॉटस्‌ऍपवरून लिंक पाठविली होती. त्यावरून प्रवेश घेतलेल्या 60 जणांची पहिली बॅच पूर्ण झाली आहे. त्यांची ऑनलाईन परीक्षाही घेतली. यातील 59 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर दुसऱ्या बॅचला एक हजार 417 जणांनी प्रवेश घेतला होता. यातील काही प्रवेश अर्ज दुबार तर काही हौसेखातर भरलेले आढळून आले. प्रत्यक्षात 971 जण सध्या मोडीचे धडे गिरवत आहेत. 

पाच राज्यांसह परदेशातील विद्यार्थी... 
मोडी लिपिच्या अभ्यासक्रमासाठी गडहिंग्लज परिसरासह महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतील लोकांनी प्रवेश घेतला आहे. तसेच मध्य प्रदेश, गुजरात, तमिळनाडू, गोवा या राज्यांतील एकूण 14 जण मोडीचा अभ्यास करीत आहेत. शिवाय मस्कट (ओमान) येथीलही एक जण मोडीचे धडे गिरवत आहेत. 

सरावाने शिकलो
गडहिंग्लज तालुक्‍यातील लोकसाहित्यावर संशोधन करीत होतो. यावेळी परिसरातील शिलालेखांचा अभ्यास करताना मोडीची गरज भासली. यातून सरावाने मोडी लिपी शिकलो. आता लॉकडाउनमुळे सारे घरीच रिकामे आहेत. त्यांच्यासाठी काहीतरी करावे, म्हणून मोफत ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केला आहे.
- डॉ. नीलेश शेळके, डॉ. घाळी महाविद्यालय, गडहिंग्लज