
हेरवाडमध्ये ठराव आणला कृतीत
कुरुंदवाड - हेरवाड (ता. शिरोळ) ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने विधवा प्रथा बंद करण्याच्या क्रांतिकारी निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असतानाच आज या ठरावाची अंमलबजावणी करत विचाराला कृतीची जोड देण्यात आली. त्याद्वारे विधवा प्रथा बंदीच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले. या ठरावाच्या अंमलबजावणीचा मान चर्मकार समाजाने मिळविला. हेरवाडने हा ऐतिहासिक ठराव ४ मे रोजी केला. गावसभेने ठराव केला. मात्र, त्याची खरी कसोटी अंमलबजावणीवेळी लागणार होती. हेरवाडकरांनी तेही साध्य करत लढ्याला बळ दिले.
हेरवाड येथील विष्णू पांडुरंग गायकवाड (वय ६०) यांचे आज निधन झाले. ते समजताच सकाळीच सरपंच सुरगोंडा पाटील व पदाधिकारी गायकवाड यांच्या घरी गेले. कुटुंबीयांचे सांत्वन करतानाच त्यांनी विधवा प्रथा बंदीबाबतचा विषय समोर ठेवत गायकवाड कुटुंबीयांचे प्रबोधन केले. महिलांनाही सर्वांबरोबर सन्मानाने जगण्याचा अधिकार असल्याचे सांगत त्यांचे कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे असा प्रकार अशोभनीय आहे. त्यामुळे चर्मकार समाजाने ही प्रथा बंद करून या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. चर्मकार समाजाचे अध्यक्ष जितेंद्र माने, उपाध्यक्ष नंदकुमार धुमाळ, संजय माने (मेजर), अर्जुन जाधव, सुखदेव माने, रमेश माने आदींनी चर्चेत भाग घेतला. गावात प्रथमच असे घडत होते. धाडस करावे की नको, अशा मनस्थितीत गायकवाड कुटुंबीय, नातलग होते. साधकबाधक चर्चा झाल्यानंतर गायकवाड कुटुंबीय व चर्मकार समाजबांधवांनी ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयाची सुरुवात आम्ही करत असल्याचे सांगत विधवा प्रथा बंदीच्या ठरावाच्या अंमलबजावणीचा झेंडा फडकवला. दरम्यान, विधवा प्रथा बंदीच्या निर्णयाची क्रांतिकारी ज्योत चर्मकार समाज बांधवांनी सुरू केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
विधवा प्रथा बंदी ठराव अंमलबजावणीचे आव्हान आमच्यासमोर होते. केवळ राज्यच नव्हे, तर देशपातळीवरही या क्रांतिकारी निर्णयाचे स्वागत झाले. त्यामुळे अंमलबजावणीच्या पातळीवर आमच्यावर दबाव होता; मात्र विष्णू गायकवाड यांच्या निधनानंतर गायकवाड कुटुंबीयांनी व चर्मकार समाज बांधवांनी ठरावाची अंमलबजावणीची सुरुवात करून ऐतिहासिक निर्णयाला बळ दिले. त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे आहेत.
- सुरगोंडा पाटील, सरपंच हेरवाड.