
पुष्पवृष्टीत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराजची मिरवणूक
01044
शिंगणापूर ः महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याची रविवारी येथे वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. (छायाचित्र : राजेंद्र पाटील)
पुष्पवृष्टीत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराजची मिरवणूक
सकाळ वृत्तसेवा
फुलेवाडी, ता. १० ः महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याचे आज राजर्षी शाहू कुस्ती केंद्र चंबुखडी-शिंगणापूर येथील घरच्या तालमीत फटाक्याची आतषबाजी व वाद्यांच्या गजरात जोरदार स्वागत केले. आखाड्यातील लाल मातीत प्रवेश करताच मानाची चांदीची गदा हनुमान चरणी अर्पण करून तो नतमस्तक झाला.
पृथ्वीराजने सायंकाळी श्री. जोतिबाचे दर्शन घेतले व थेट शिंगणापूर येथील घरच्या तालमीत आला. पृथ्वीराजचे आगमन होताच येथील आखाड्याचे वस्ताद जालिंदर मुंडे यांनी पुष्पहार घालून त्याचे स्वागत केले. यावेळी मल्लांनी व तालीम परिसरातील लोकांनी त्याच्यावर पुष्पवृष्टी केली. शिंगणापूर रस्त्यावरून वाजत, गाजत, नाचत त्याची आखाड्यापर्यंत मिरवणूक काढली. जागोजागी महिलांनी औक्षण केले.
आखाड्यात आल्यानंतर वस्ताद मुंडे यांनी त्याचा सत्कार केला. अवघे तीस किलो वजन असल्यापासून पृथ्वीराज शिंगणापूरच्या कुस्ती केंद्रात नियमित सराव करत आहे. या आखाड्यात शंभर किलो वजन असणाऱ्या गणेश व सूरज मुंडे आदी पैलवानांबरोबर त्याने कुस्तीचे डावपेच गिरविले. वस्ताद जालिंदर मुंडे, प्रशिक्षक शिवाजी पाटील (आमशी), सुनील फाटक (कोगे) यांच्या मार्गदर्शनाखाली आठ वर्षे त्याने शिंगणापूरच्या तालमीत सराव केला.
यावेळी पृथ्वीराज म्हणाला, ‘‘तीस किलो वजन होते; तेंव्हापासून मी या तालमीत कुस्तीचे धडे घेत आहे. वस्ताद जालिंदर मुंडे व आखाड्याचे माझ्या यशात मोठे श्रेय आहे.’’
वस्ताद मुंडे म्हणाले, ‘‘जिद्द व चिकाटीच्या जोरावर पृथ्वीराजने यश मिळवले आहे. तो निगर्वी व आज्ञाधारक आहे.’’
प्रशिक्षक सुनील फाटक म्हणाले, ‘‘पृथ्वीराजची महाराष्ट्र केसरी होण्याची इच्छाशक्ती मोठी होती. त्यामुळे तो सातत्यपूर्ण सरावात कधीही कमी पडला नाही. सांगेल त्या गोष्टी तो नेहमी करायचा. सणावारालाही तो कधी गावी गेला नाही. सरावात खंड पडू दिला नाही. यामुळे तो यशस्वी झाला.’’
दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते पृथ्वीराज पाटील याचा सत्कार झाला. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आशिष कोरगावकर, पैलवान सोनबा गोंगाने, संग्राम पाटील आदी उपस्थित होते.
फोटो ओळी
01044
शिंगणापूर ः महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याची रविवारी येथे वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..