चिंचेच्या प्रक्रीयेतून नवउद्योजकांसाठी संधीचे द्वार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिंचेच्या प्रक्रीयेतून नवउद्योजकांसाठी संधीचे द्वार
चिंचेच्या प्रक्रीयेतून नवउद्योजकांसाठी संधीचे द्वार

चिंचेच्या प्रक्रीयेतून नवउद्योजकांसाठी संधीचे द्वार

sakal_logo
By

17362
01229
कागणी ः येथील बाचूळकर यांच्या शेतातील चिंचेचे झाड.

-----------------------------
चिंचेच्या खाद्यान्नातील महत्त्वामुळे
नवउद्योजकांना संधी

भारतीय आहार पद्धतीमध्ये चिंचेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चवीला आंबट-गोड असलेल्या चिंचेचा केचअप, आईस्क्रीम, सॉस, सरबत, बेकरी पदार्थ आदी असंख्य खाद्यान्नामध्ये उपयोग केला जातो. चिंचेच्या पाण्याशिवाय भेळेचा चटकदारपणा आणि समोस्याची लज्जत वाढत नाही. चिंच अनेक औषधांमध्ये वापरली जाते. कोणतेही शारीरिक कष्ट न घेता दरवर्षी मालकाला हमखास उत्पन्न देणारी चिंचेची झाडे खेडोपाडी पहायला मिळतात. त्यामुळेच ‘ज्याच्या दारी चिंचेचे झाड तो सावकार’ अशी म्हण आहे. चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यात दरवर्षी सुमारे १०० टनांहून अधिक चिंचेचे उत्पादन होते. चिंचेच्या खरेदी-विक्रीतून सुमारे ४० कोटी रुपयांची उलाढाल होते. स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो. आधुनिक समाजात खाद्यपदार्थांचे महत्त्व, वाढती मागणी आणि चवीबाबत तडजोड न करता हवी ती किंमत मोजण्याची तयारी पाहता चिंचेचे महत्त्व वाढले आहे. चिंच पिकासाठी या विभागातील पोषक हवामान पाहता शेतकऱ्यांनी आणि नवउद्योजकांनी या संधीचा लाभ घ्यायला हवा.
- सुनील कोंडुसकर, चंदगड.
-------------
हवामानाचा कालावधी
जमीन, माती, पाणी, हवामान यातील फरकानुसार झाडाची कमी-जास्त प्रमाणात वाढ होते. मध्यम आकारापासून २४ मीटर उंचीपर्यंत झाड वाढते. त्याचा घेर सात मीटरपर्यंत असतो. फांद्या चिवट, खोड आखूड व जाड असते. खोडाचा रंग लाल, तपकिरी किंवा काळसर असतो. एप्रिल, मे महिन्यात पाने गळू लागतात. लगेच त्या ठिकाणी नवीन पालवी फुटते. त्यामुळे झाड नेहमी सदाहरीत दिसते. नवीन पालवी फुटते त्यावेळी कळ्या येतात. जून-जुलैपर्यंत फुलांचा हंगाम चालतो. झाडावरील लाल मुंग्या, मधमाश्‍या व इतर कीटक परागीभवनाची कामगिरी पार पाडतात. त्यानंतर फलधारणा होते. जुलै, ऑगस्टमध्ये लहान-लहान हिरव्या रंगाच्या चिंचा येतात. नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत त्याची पूर्ण वाढ होते. लांबी तीनपासून १२ इंचापर्यंत तर रुंदी पाऊण ते एक इंच असते. जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत चिंचा पूर्ण पिकतात.
------------
असा ठरतो दर
चिंचेच्या फळामध्ये विविध प्रकार आहेत. काही चिंचा सरळ फुगीर असतात. त्यात बिया अधिक असतात. फुगीर व वाकड्या चिंचात गर अधिक असतो. काही फळे सरळ व चपटी असतात तर काही वाकडी असतात. चिंचेची लांबी, गर व बियांचे वजन, त्यांची जाडी, फायबरचे प्रमाण यावर व्यापाऱ्यांकडून चिंचांचा दर ठरवला जातो.
------------
अशी होते प्रक्रिया
चिंचा पूर्ण पिकल्यावर त्या झाडावरून काढतात. एकत्र करून पोत्यात भरतात. मजुरांकरवी चिंचेवरील टरफल काढले जाते. गरातील चिंचोकेही काढले जातात. त्यानंतर गरात मीठ मिसळून त्याचे लहान, लहान गोळे केले जातात. सिरफ, रसाचा अर्क, रस व थंड पेय यासाठी त्याचा गरजेनुसार उपयोग करता येतो. चिंचेच्या गरापासून चिंच पावडरही बनवली जाते.
-------------
चिंचेची विविध वाणं
चिंच कुळात एकूण २४ उपजाती आहेत. त्यामध्ये योगेश्वरी, अजंठा, थायलंड अशा जाती आहेत. मराठवाडा कृषी विद्यापीठाने प्रतिष्ठान नावाची चिंचेची जात शोधली आहे.
-------------
एका झाडापासून मिळणारे उत्पन्न
चिंचेचे झाड १३-१४ वर्षांचे झाल्यानंतर उत्पन्न द्यायला सुरुवात करते. एका वाढलेल्या झाडापासून दरवर्षी १५० ते ३०० किलो चिंचा मिळतात. ज्याप्रमाणे झाडाची वाढ होत जाईल. त्याप्रमाणे उत्पन्न वाढत जाते. सध्याचा किलोचा दर ३० ते ३५ रुपये आहे. सरासरी एक झाड वर्षाला ३ ते ४ हजार रुपयांचे उत्पन्न देते. अगदी १०० वर्षांपर्यंत हे झाड उत्पन्न देते.
-------------
खाद्यपदार्थातील उपयोग
- चिंचेचा ५५ टक्के भाग गराने व्यापलेला असतो. १४ टक्के चिंचोके असतात.
- चिंचेत आंबट गोड रसायन असते.
- चिंचेची उत्तम चटणी बनवता येते. सॉस आणि सरबतही बनवता येते.
- आंबट रसायन वापरून उत्तम आरोग्यदायी पेय बनवतात.
- चटकदार भेळ, पाणीपुरी यासाठी चिंचेचे पाणी वापरतात.
- गोळ्या, बिस्किटे, चॉकलेटमध्ये वापर.
-------------
भांडी स्वच्छतेसाठी उपयोग
चिंचेमध्ये अॅसिडमुळे तांब्या-पितळेची भांडी लख्ख होतात. ग्रामीण भागात भांड्याच्या स्वच्छतेसाठी चिंचेच्या आमसुलाचा वापर केला जातो.

औषधी गुणधर्म, महत्त्व
खाद्यपदार्थाची चव वाढवण्यासाठी चिंचेचे अमचूर वापरले जाते. आयुर्वेद व औषधी प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते. तापामध्ये शरीर थंड ठेवणारे घटक असल्याने औषध म्हणून वापर होतो. चिंचेच्या फळांच्या लगद्याचा उपयोग पाचन, पित्त विकारांवर उपाय म्हणून होतो. उन्हाची झळ कमी करणे, धोत्र्याच्या फुलाची विषबाधा आणि मादक नशा कमी करण्यासाठीसुद्धा उपयोग होतो. याशिवाय चिंच भूक वाढवण्यास मदत करते, श्रम, भ्रम व ग्लानी दूर करते, चिंचेची कोवळी पाने खाण्यासाठी तसेच भाजीसाठी वापरतात. ती वात, पित्तनाशक आहेत. सूज कमी करण्यासाठी पानांचा वापर केला जातो. चिंचेत लोह, तांबे, क्लोरिन, फॉस्फरस व गंधक ही खनिजे असतात. उष्माघातात चिंच सरबत किंवा पन्हे हितकारक असतात.
---------------
चिंचोक्याचा उपयोग
चिंचोक्यामध्ये पेक्टिन, स्टार्च व टॅनिन असते. आदिवासी समाज चिंचोक्याच्या पीठाची भाकरी बनवून खातात. या पीठापासून खळ बनवतात. चिंचोके भाजून किंवा उकडून खातात. लोकर, रेशीम व इतर धाग्यांचे कापड विणताना चिंचोक्याच्या टरफलाचा उपयोग केला जातो. घोंगड्याला खळ देण्यासाठी चिंचोक्याच्या टरफलाचा उपयोग केला जातो. खाद्यपदार्थातील द्रवाला घनरुपता आणण्यासाठी पेक्टिनचा उपयोग करतात. चिंचोक्यावर विशिष्ट प्रक्रिया करून त्यातील पेक्टीन, प्रोटिन व स्टार्च वेगवेगळे करतात. जॅम, जेली, कॅनिंग व फळप्रक्रियेत पेक्टीनचा उपयोग करतात. त्यापासून गम बनवला जातो. पेट्रोलियम उद्योगातही चिंचोक्यांना मागणी असते.
------------------
चिंचेच्या लाकडाचा उपयोग
चिंचेचे लाकूड अतिशय कठीण, चिवट व दणकट असते. या लाकडापासून पूर्वी तेलाचा घाणा, मुसळ, बैलगाडीची चाके, आस, कुंभाराचे चाक, शिक्के, लाकडी हातोडा व फर्निचर आदी टिकाऊ वस्तू बनवतात. एखादा वृक्ष खूप जुना झाल्यावरच तोडतात. त्यापासून ५ ते ६ घनफूट इमारती लाकूड मिळते. २ ते ३ टन जळणाचे सरपण मिळते. चिंचेच्या लाकडापासून उत्कृष्ट दर्जाचा कोळसा मिळतो.
---------------
पर्यावरणीय महत्त्व
चिंचेच्या झाडाची मुळे ९ ते १२ मीटर खोल जमिनीत जातात. त्यामुळे जमिनीवरील मातीची धूप होत नाही. चिंचेच्या झाडाखाली दाट सावली असल्यामुळे इतर कोणतेही झाड वाढत नाही. सूर्यप्रकाशाचा अभाव आणि चिंचेच्या आम्लवर्णीय गुणधर्माचा हा परिणाम आहे. कावळे, बगळे, करकोचे आदी पक्षी या झाडावर घरटी बांधतात. झाडाच्या फांद्या लवचिक असल्यामुळे वादळवाऱ्याने मोडत नाहीत. झाडाच्या फांद्यांचा गच्च गुचडा असल्यामुळे शिकारी प्राणी व साप यांना घरट्यांपर्यंत पोहोचता येत नाही. घरट्यांसाठी एवढी सुरक्षितता असल्यामुळे पक्षी या झाडावर घरटी बांधण्याला पसंती देतात. झाडावरील पक्ष्यांच्या वसाहतीला ‘सारंगगार’ म्हणतात.
------------
भारतीय खजूर
चिंचेचा वृक्ष दीर्घायुषी आहे. त्याचे आयुर्मान ६० ते १०० वर्षांचे असते. तामिळनाडून २०० वर्षांपर्यंतची झाडे आहेत. हे झाड वर्षानुवर्षे फळ देते. त्यामळे ते सहसा तोडले जात नाही. पिकून परिपक्व झालेल्या चिंचेच्या गराची तुलना खजुराशी केली आहे. पारशी भाषेत त्याला ‘तमर-ई-हिंद’ असे म्हटले जाते. त्याचा अर्थ चिंच हा भारतीय खजूर आहे.
--------------
चिंचेचे गाव
‘चिंचणे’चंदगड तालुक्यातील कर्नाटक हद्दीवरील चिंचणे या गावाला चिंचेच्या झाडावरूनच नाव पडले असावे असे सांगितले जाते. गावच्या सभोवती तीसहून अधिक मोठमोठ्ठी चिंचेची झाडे होती. दरवर्षी ग्रामपंचायतीकडून या झाडांच्या चिंचांचा लिलाव व्हायचा. दड्डी (जि. बेळगाव) येथील व्यापारी तो लिलाव घ्यायचे. स्थानिक मजुरांकडून चिंचा गोळा करायचे. दड्डी ही चिंचेची मोठी व्यापारपेठ होती. चिंचेवरील टरफल काढणे, आतील चिंचोके बाजूला करणे, उर्वरित गराचे गोळे तयार करणे यासाठी स्थानिक महिलांना मोठा रोजगार उपलब्ध झाला होता.
---------------
व्यवसायापुढच्या समस्या
स्थानिक आठवडा बाजारातून किरकोळ स्वरुपात गोळा झालेली चिंच दड्डी, बेळगाव, गडहिंग्लज येथील व्यापाऱ्यांकडे एकत्र येते. तिथून ती मोठे व्यापारी प्रक्रीयेसाठी उचल करतात. दड्डी, कडगाव, महागाव (ता. गडहिंग्लज), सुळे (ता. आजरा) या ठिकाणी स्थानिक प्रक्रिया उद्योग आहेत. परसात, शेतात जोपासलेली चिंचेची झाडे घर बांधणी, बागायती शेतीमुळे मोठ्या प्रमाणात तोड झाली. त्यामुळे उत्पादनात घट झाली. या झाडावर चढणे, चिंचा झाडणे हे काम अवघड आणि जिवावर बेतणारे असल्याने मजुरांचा तुटवडा भासू लागला. चिंचेसारख्या कष्टदायक कामापेक्षा अन्य कामातून चांगले पैसे मिळू लागल्याने व्यावसायिकांनी आणि मजुरांनीही या व्यवसायाकडे पाठ फिरवली.
-------------
ऊर्जितावस्थेसाठी काय करावे लागेल? चिंचेचे उत्पादन वाढण्यासाठी झाडांची लागवड, जोपासना महत्त्वाची आहे. रस्त्याच्या कडेने, गायरान हद्दीत चिंच लागवडीला प्राधान्य द्यायला हवे. पिकलेल्या चिंचा झाडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करायला हवा. स्थानिक पातळीवर लघुउद्योगाच्या माध्यमातून प्राथमिक प्रक्रिया करून गरजेनुसार ती अन्य बाजारपेठेत पाठवायला हवी. शासनाने त्यासाठी सोयी, सवलती पुरवायला हव्यात. शीतगृहाची सोय करून द्यायला हवी.
-------------
01233
रोहित जोशी

‘स्वतः लक्ष घातले अन् फायदा झाला’ लॉकडाऊनमुळे वर्क फ्रॉम होमसाठी गावी आलेला तो युवक. घरची शेती कसता कसता त्याला बांधावरील चिंचेचे महत्त्व कळाले. व्यापाऱ्यांना झाडे खंडून देण्याऐवजी स्वतः झाडणी, फोडणी करून चिंचेची विक्री केली. खर्च जाऊन किलो मागे शंभर-सव्वाशे रुपयांचा फायदा झाला. नंदनवाड (ता. गडहिंग्लज) येथील रोहित जोशी या युवकाची ही यशकथा. शेतकऱ्यांनी स्वतः लक्ष घातले, तर अधिक नफा मिळतो असा विश्‍वासही त्याने व्यक्त केला. रोहितच्या शेतातील बांधावर चिंचेची झाडे आहेत. वडील दरवर्षी हंगामात व्यापाऱ्यांना ही झाडे खंडून देत होते. अवघ्या अडीच हजार रुपयांना सौदा व्हायचा. रोहितने त्यात बदल केला. मजूर घेऊन चिंचा काढल्या. हलकर्णी येथील महिलांकडून मजुरीने चिंचोके काढून घेतले. चिंचोक्यांची विक्री केली. चिंचेच्या गराचे वेगवेगळ्या वजनानुसार दर्जेदार पॅकिंग केले. नातेवाईकांच्या माध्यमातून कोल्हापूर, पुणे आदी शहरात विक्री केली. किलोला १६० रुपये दर मिळाला. जो व्यापाऱ्यांपेक्षा शंभर रुपयांहून अधिक होता. यंदाही ग्राहकांची मागणी येऊ लागली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचता आले. शेतकऱ्यांनी चिंचेकडे व्यापारी दृष्टिकोनातून पाहायला हवे. स्वतः मार्केटिंगचे तंत्र अवलंबले तर अधिक उत्पन्न मिळू शकते, असे रोहित विश्‍वासाने सांगतो.
-------------------
01228
चंदगड तालुक्यातील चिंचणे, कामेवाडी, कोवाड, कुदनूर, दुंडगे, कागणी, अडकूरचा परिसर, गडहिंग्लज तालुक्यातील अत्याळ, बेळगुंदी, इंचनाळ, कडगाव तसेच आजरा तालुक्यातील भादवण, सोहाळे, साळगाव, पेरणोली, मडिलगे परिसरात चिंचेचे उत्पादन सर्वाधिक आहे. चित्री, जंगमहट्टी प्रकल्पांमुळे बागायती पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे शेतातील मोठमोठ्ठी झाडे तोडली गेली. पर्यायाने अलीकडच्या काळात उत्पादन घटले आहे.
- संभाजी केसरकर, चिंच व्यापारी बेळगुंदी, गडहिंग्लज.
----------------------
01227
पाच-सहा वर्षे हे काम केले. परंतु, हे काम हंगामी असल्याने मी दुसऱ्या व्यवसायात उतरलो. चिंचा फांदीच्या टोकापर्यंत लगडलेल्या असतात. त्यामुळे त्या झाडण्याचे काम जोखमीचे असते. त्यामुळे नवीन पिढी या व्यवसायात येण्याचे धाडस करीत नाही. यांत्रिकीकरणाचा वापर करून त्या काढायच्या म्हटल्या तर खर्च वाढतो. त्या तुलनेत चिंचेला दर मिळायला हवा.
- युवराज कांबळे, बेळगुंदी, ता. गडहिंग्लज
------------------
01231
झाडावर चढून चिंचा खाली पाडायच्या. कुटुंबातील आणि मजुरीच्या स्त्रियांनी त्या खाली गोळा करून पोत्यात भरायच्या. जमा झालेला माल गडहिंग्लज येथे व्यापाऱ्याच्या स्वाधीन करायचा. व्यापाऱ्याकडून दिवसाची मजुरी मिळायची. सुरुवात केली त्यावेळी ५ रुपये मजुरी होती. ज्यावर्षी काम बंद केले त्यावेळेपर्यंत ती २५ रुपयांवर पोहोचली होती. वयोमानामुळे कुटुंबातून विरोध होऊ लागला म्हणून हा व्यवसाय बंद केला.
- बिराप्पा रानगे, बेळगुंदी, ता. गडहिंग्लज
---------------------
01232
अडकूर परिसरात चिंचेची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. कोणताही खर्च न करता चिंचेपासून चिंचेचे उत्पादन मिळते. हा वृक्ष बारमाही पानाने डवरलेला असल्यामुळे उन्हाळ्यात झाडाखाली जनावरे बांधता येतात. या परिसरात शंभर वर्षांहून अधिक वयोमानाची चिंचेची झाडे आहेत व ती अजूनही उत्पादन देतात.
- पिंटू ऊर्फ नामदेव गुरव, चिंच उत्पादक, आमरोळी, ता. चंदगड
--------------------
01236
२००५ पासून २०१३ पर्यंत चिंचेवर प्रक्रिया उद्योग चालवला. त्याला ग्राहकांचा प्रतिसादही प्रचंड मिळाला. मागणीएवढा पुरवठा करण्यासाठी व्यवसायाची वाढ करणे गरजेचे होते. त्यासाठी भांडवल कमी पडल्यामुळे मी व्यवसाय मर्यादित केला. परंतु, या विभागातील चिंचेचे उत्पादन विचारात घेता त्यावर आधारित एक मोठा प्रक्रिया उद्योग चालू शकतो.
- काशीनाथ रेडेकर, चिंच प्रक्रिया उद्योजक, सुळे, ता. आजरा

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top