
खड्डे असोत,वा धुरळा.... आम्हाला आवडतो पन्हाळा...
खड्डे असोत वा धुरळा;
आम्हाला आवडतो पन्हाळा...
आनंद जगताप ः सकाळ वृत्तसेवा
पन्हाळा, ता. २४ ः कोरोनाचं सावट कमी झालंय.. साहजिकच दोन वर्षे घरात बसून कंटाळलेले लोक आता सुट्टी गाठून बाहेर पडत आहेत. थंड हवेचं, ऐतिहासिक आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं पर्यटन स्थळ म्हणजे पन्हाळा..सर्व सामान्यांच्या खिशाला परवडणारा व पर्यटकाना आपलेसे करणारा...
याच पन्हाळगडावर येणारा रस्ता जुलै महिन्यात खचला आणि पर्यटकांची गडावर येण्याची वाट बंद झाली. पर्यटकांवर अवलंबून असणारे गडावरील छोटे छोटे व्यवसाय बंद पडले आणि या लोकांवर उपासमारीची वेळ आली. नागरिकांची, शासकीय कामासाठी येणाऱ्या पक्षकारांची अडचण लक्षात घेऊन नगरपरिषदेने वनखात्याची परवानगी घेऊन रेडे घाटी मार्गे तात्पुरता कच्चा रस्ता तयार केला.अर्थात हा रस्ता बुरुम मातीचा असल्याने वाहनांमुळे धुळीचा बनला आहे. पाऊस पडला की हा रस्ता चिखलाने भरून निसरडा होतो. त्यातूनही पर्यटक पन्हाळगडी येत आहेत. जोरदार पावसाने आज या रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण बनले. चिखलात गाड्यांची चाके तिथल्या तिथे फिरु लागल्याने सकाळी पर्यटकांनी गाडी तिथेच थांबवून गुरुवार पेठेतून चालत येणे पसंत केले.
जोतिबा यात्रेच्या पाकाळणीसाठी आलेल्या भक्तांची आणि पर्यटकांची आज पन्हाळगडी एकच गर्दी झाली. बरोबर आणलेले जेवणाचे डबे, लहान मुले यांना घेऊन येताना त्यांची दमछाक होत होती. मुख्य रस्ता दुरुस्तीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे या कामावर असलेल्या रोलर,जे.सी बी मशिन तसेच खडी घेऊन येणारे डंपर यांचा त्रास पर्यटकांना होऊ नये म्हणून गेल्या आठ दिवसांपासून या मार्गावरील दुचाकीसह सर्व वाहतूक बंद केली आहे; पण आज पावसाने पर्यायी मार्गाने दुचाकी घेऊन येणे शक्य नसल्याने तसेच दुपारी गोव्याचा कळप या रस्त्यावर आल्याने बऱ्याच दुचाकीस्वारांनी धोका पत्करून काम चालू असलेल्या रस्त्याने तशाच गाड्या रेमटल्या.
चौकट
आल्हाददायक वातावरण
लोकांची अडचण पाहून मजुरांनी दुपार पासून आपले कामच बंद ठेवल्याने या रस्त्यावरून दुचाकीसह हलक्या चारचाकी वाहनेही घाबरत घाबरत जाऊ लागली. एकंदरीत रस्ता कच्चा असो वा पक्का, धुळीचा असो वा चिखलाचा पन्हाळगडी यायचे म्हणजे यायचे असे ठरवूनच गडाची मजा लुटली. गडावरचं वातावरण ही सकाळी पाऊस, दुपारी ऊन आणि वाऱ्याच्या मंद झुळका असे आल्हाददायक असल्याने सर्वांच्याच चेहऱ्यावरील मळभ दूर झाले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..