निवडणुकीत मीम्सने रंगत
‘मीम्स’नी उडवला प्रचारात धुरळा
‘उत्तर’चे वातावरण तापले; अखेरच्या टप्प्यात दिग्गज नेत्यांमुळे रंगत
कोल्हापूर, ता. ७ ः सोशल मीडियावर मनोरंजनासाठी बनवले जाणारे ‘मीम्स’ आता कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत रंगत आणत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था, व्यवसाय, वैयक्तिक पातळीवरील मुद्दे घेऊन कधी कोपरखळी, कधी चिमटा तर कधी वर्मी बसणारे मीम्स बनवले जात आहेत. त्यामध्ये लोकप्रिय मालिका, गाणी, नृत्यांच्या व्हिडिओचा वापर केला जात असून ही मीम्स अनेकांच्या मोबाईलवर धुमाकूळ घालत आहेत. जाता जाता विरोधकांच्या शिडातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न होत असल्याने एखादे मीम्स येताच मोठ्या प्रमणावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, मतदानाला पाच दिवसांचा अवधी राहिल्याने दोन्ही आघाडीकडील राज्य पातळीवरील दिग्गज नेते कोल्हापुरात ठाण मांडून असून या नेत्यांच्या सभा, प्रचार फेऱ्यांनी अखेरच्या टप्प्यात प्रचारात चांगलीच रंगत आली आहे. मतदानाची तारीख जवळ येईल तशी पोटनिवडणुकीतील ईर्षा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विरोधकाचा कोणताही मुद्दा प्रचारातून सुटता कामा नये याची दक्षता घेतली जात आहे. प्रत्येक पातळीवर तोडीस तोड उत्तर दिले जात आहे. यामुळे नागरिकांना दररोज वेगवेगळे विषय चर्चेला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर तयार केल्या जाणाऱ्या भन्नाट मीम्समधून नेत्यांची व त्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली जात आहे. काही मराठी मालिकांचा आधार घेत ते तयार केले जात असून कोल्हापुरी भाषेचा वापर केला जात आहे. भावा, नादखुळा यासह अस्सल कोल्हापुरी शब्दांचा चपखल वापर करून वातावरण निर्मिती केली जात आहे.
यात महापालिकेत गाजलेल्या विविध विषयांचा तसेच यापूर्वीच्या निवडणुकांमधील जय-पराजयाचा समावेश केला जात आहे. यामुळे मतदारांची करमणूक तर होत आहेच. शिवाय प्रचारातील मुद्द्यांना अधिक आक्रमकपणे मांडण्यात येत आहेत. यातून काही वैयक्तिक विषयांनाही हात घातला जात असला तरी व्हायरल होणाऱ्या मीम्समधून निवडणुकीत चांगलाच रंग भरला जात आहे.
शहर निघाले ढवळून
निवडणुकीचा प्रचार ऐन भरात आला आहे. जाहीर प्रचाराचे अवघे तीनच दिवस हातात असल्याने उमेदवार, त्यांचे पक्ष, कार्यकर्त्यांनी जिवाचे रान करण्यास सुरूवात केली आहे. बऱ्याच वर्षांनी राज्यातील नेत्यांच्या एकापाठोपाठ एक अशा प्रचारसभा होत आहेत. याशिवाय स्थानिक नेते, माजी नगरसेवकांच्या कोपरा सभा, पदयात्रा, भेटीगाठींनी शहर ढवळून निघत आहे. सोबतीला चाय पे चर्चा, मिसळ पे चर्चाही सुरू आहेत. प्रचारामध्ये महिलांचा सहभागही वाढू लागला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.