
पंचगंगा प्रदूषण राजकीय अजेंड्यावर
पंचगंगा प्रदूषणाचा
प्रश्न राजकीय अजेंड्यावर
--
आजी, माजी मुख्यमंत्र्यांनी दिले नदी स्वच्छतेचे आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.१०ः एरवी कधीही निवडणुकीच्या प्रचारात नसणारा पंचगंगा नदी प्रदूषणाचा मुद्दा आता राजकीय पक्षांच्या वचनाम्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीही पंचगंगा प्रदूषण मुक्त करण्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन दिले. तसेच नदीच्या महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना प्रस्ताव दिल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आराखडा तयार केला असून, त्याची कार्यवाही लकरच सुरू करू, असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले. ‘सकाळ’ने सातत्याने उचलून धरलेल्या नदी प्रदूषणाच्या प्रश्नाला आता सर्वच पक्षांच्या वचननाम्यात स्थान मिळाले आहे.
पंचगगा नदी प्रदूषण हा दिवसेंदिवस गंभीर बनलेला प्रश्न आहे. शहरातील नाल्यातून पाच एमएलडी सांडपाणी थेट नदीत मिसळते तर नदीकाठी असणारी ३९ गावे आणि इचलकरंजी नगरपालिका क्षेत्रातील औद्योगिक सांडपाणीही नदीत मिसळते. यामुळे नदी प्रदूषण वाढते. त्यामुळे नदी काठच्या गावात आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. नदीत मासे मृत्युमुखी पडण्याच्या घटनाही वाढल्या. त्यामुळे ‘सकाळ’ने पुन्हा ‘चला पंचगंगा वाचवूया’ हे अभियान सुरू केले. याअंतर्गत नदी प्रदूषण आणि त्याचे परिणाम या अनुषंगाने बातम्या आणि लेख प्रसिद्ध केले जात आहेत. समाज प्रबोधनासाठी विविध उपक्रमही घेतले गेले आहेत. याचा परिणाम म्हणून आता विधानसभा पोटनिवडणुकीच्या दृष्टिकोनातून आता राजकीय पक्षांनीही नदी प्रदूषणाचा प्रश्न आपल्या वचननाम्यात आणि भाषणात घेतला आहे.
श्री. फडणवीस यांनी आम्हाला निवडून द्या आम्ही स्वच्छ पंचगंगा देऊ, असे सांगितले, तर आमदार विनय कोरे यांनी गंगा शुद्धीकरण प्रकल्पाचे उदाहरण देत निधी देण्याची मागणी केली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज झालेल्या सभेत पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले. पूर्वी राजकीय नेत्यांनी दुर्लक्षित केलेला नदी प्रदूषणाचा मुद्दा ‘सकाळ’च्या पाठपुराव्यामुळे प्रचारातील प्रमुख मुद्दा बनला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..