
उत्तर-पुनरावृत्ती
पुनरावृत्ती देगलूर की पंढरपूरची
राज्यात ‘उत्तर’ची उत्सुकता; चार राज्यांतील विजयाने भाजपला आत्मविश्वास
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ ः राज्यात पोटनिवडणूक असलेल्या एकमेव कोल्हापूर उत्तर मतदारसंघात देगलूरची पुनरावृत्ती होणार की पंढरपूरची याची उत्सुकता राज्यातील राजकीय क्षेत्राला लागली आहे. ही निवडणूक चार राज्यांतील भाजपच्या दणदणीत विजयानंतर होत असल्याने या निवडणुकीत भाजपचाही आत्मविश्वास वाढला आहे, त्याचे पडसाद किती उमटतील ते शनिवारी (ता. १६) स्पष्ट होईल.
राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीला मतदारांनी कौल दिला होता; पण भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेने राष्ट्रवादी व काँग्रेसशी हातमिळवणी करत सत्ता मिळवली. त्यानंतर राज्यात देगलूर व पंढरपूर-कवठेमहाकांळ मतदारसंघाचे तत्कालीन आमदार अनुक्रमे रावसाहेब अंतापूरकर व भारतनाना भालके यांचे निधन झाले. या दोन्हीही निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी प्रयत्न केले; पण त्याला यश आले नाही. परिणामी या दोन्ही निवडणुका भाजपने ताकदीने लढवल्या.
त्या वेळी देगलूर शिवसेनेकडे, तर पंढरपूर भाजपकडे होता. देगलूरचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या अकाली निधनामुळे या मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली, त्यात ही जागा राखण्यात काँग्रेसला यश आले. अतापूरकर यांचे पुत्र जितेश हे १ लाख आठ हजार मते घेऊन विजयी झाले. या पोटनिवडणुकीत भाजपची मते तीन हजारांनी वाढली. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमदेवार असलेले सुभाष साबणे पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार होते एवढाच फरक; पण मतांत झालेली वाढ भाजपला सुखावणारी होती.
या पोटनिवडणुकीनंतर पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत मात्र भाजपने काठावर का असेना विजय मिळवला. विशेष म्हणजे भाजपचे पोटनिवडणुकीतील विजयी उमेदवार समाधान अवताडे अपक्ष होते. २०१९ च्या निवडणुकीत सुधाकर परिचारक भाजपचे उमेदवार होते. पोटनिवडणुकीच्या तोंडावर श्री. अवताडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून ही जागा जिंकली. नुसती ही जागा भाजपने जिंकली नाही तर त्यांच्या मतांतही वाढ झाली.
दोन महिन्यांपूर्वी देशातील पाचपैकी चार राज्यांत भाजपने एकहाती सत्ता मिळवली. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर उत्तरची निवडणूक जाहीर झाली होती. २०१९ ला ही जागा युतीत शिवसेनेच्या वाट्याला होती, तत्पूर्वी शिवसेनेचे तत्कालीन आमदार राजेश क्षीरसागर व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात वादाची ठिणगी पडली. त्यातून भाजपने मदत न केल्यानेच पराभव झाल्याचा आरोप श्री. क्षीरसागर यांनी केला होता. आता पोटनिवडणुकीत मात्र ही जागा काँग्रेसला गेली आणि राष्ट्रवादी व सेनेने त्यांना पाठिंबा दिला. चार राज्यांतील विजय, शिवसेनेची नाराजी, सरकारविरोधात असलेला रोष, प्रचारात गाजलेले भ्रष्टाचाराचे मुद्दे या पार्श्वभूमीवर उत्तरमध्ये देगलूरची पुनरावृत्ती होणार की पंढरपूरची याची मात्र उत्सुकता लागून आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..