
जगणं वर्दीतल
मालिका लोगो
-
जगणं वर्दीतलं...
(भाग एक)
-
लीड
कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी पोलिस दल सांभाळते. त्यांच्या कर्तव्याला वेळ-काळ नसतो. पोलिस म्हटलं की २४ तास कर्तव्याला बांधिल. अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांचा कामाचा तास दिवसेंदिवस वाढतो आहे. पोलिस दलामध्ये काम करणाऱ्या दांपत्याला कर्तव्य आणि संसाराची जाबाबदारी पेलताना चांगलीच कसरत करावी लागते. प्रथम वर्दीचा सन्मान, कर्तव्याला प्राधान्य देत ही दांपत्य संसाराचा गाडा कसा ओढतात. यावर या मालिकेतून टाकण्यात आलेला प्रकाशझोत.
कार्यक्रमाला दोघांनी यायलाचं लागतंय!
नातेवाईकांचा आग्रह; रजा सुटीवरच बेत, प्रथम कर्तव्याला प्राधान्य
राजेश मोरे : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ : ‘एक महिना भर अगोदर सांगतोय, मुलाच्या लग्नाची ही तारीख ठरली आहे. दोघांनीपण यायलाचं लागतंय. तुम्ही दोघं पोलिस, आताच रजा टाका, काहीही कारणं चालणार नाहीत. घरातलं शेवटचं लग्न कार्य आहे. तुझा तर तो सख्या चुलत भाऊ आहे, हे लक्षात ठेव. मोठा म्हणून तू आणि तुझ्या बायकोनचं सारे पुढे होऊन करायचं आहे. बाकी काय सांगायचं नाही’ असे भावकीतील हक्काचं आमंत्रण मिळाले; पण वर्दीतील जबाबदारी कर्तव्ये त्यांना सांगून कशी चालायची. मला होकार द्यावा लागला. मला रजा मिळाली; पण बंदोबस्तामुळे तिला (पत्नीला) रजा मागणंही अवघड झाले. नाईलाजाने एकटाच समारंभाला गेलो. मला एकट्यालाच पाहून नातेवाईकांनी धरलेला अबोला यामधून त्यांच्यातील नाराजी, राग याचा अनुभव क्षणाक्षणाला येत होता. त्यातच एकाने ‘तुम्ही काय बाबा मोठी माणसं’ असे बोलून उरली सुरली कसरही भरून काढली, असा अनुभव वर्दीतील एका कर्मचाऱ्याने सांगितला.
हे झालं एक प्रातिनिधिक उदाहरण. मात्र, वर्दीतील प्रत्येक दांपत्याला कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांमुळे असे अनुभव नवे नाहीत. पोलिसांवर कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असते. त्यात गुन्ह्यांचा तपास, बंदोबस्ताची जबाबदारीही असते. जिल्हा पोलिस दलात सुमारे शंभर दांपत्य आहेत. यातील काही मोजकी दांपत्य एकाच पोलिस ठाण्यात असून, तर इतर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावत आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कधी सांगून येत नाही. त्यामुळे पोलिसांना ॲडव्हान्स रजा टाकता येत नाही. अथवा ती मिळेल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे त्यांना घरगुती मंगलकार्य अगर दुःखाच्या प्रसंगाला जाता येईलच हे सांगता येत नाही. प्रभारी अधिकारी हे दांपत्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना आवश्यक ते सहकार्यही करतात; पण प्रत्येक वेळी ते शक्य होईल असे नसते.
वर्दी परिधान केली आहे. कोणतीही सबब सांगायची नाही. तिचा सन्मान राखायचा आणि सोपवलेली कर्तव्य प्रथम पूर्ण करायची. त्यानंतरच संसाराच्या जबाबदाऱ्यांकडे लक्ष द्यायचे अशी भूमिका जिल्ह्यातील वर्दीतील दांपत्यांची आहे. त्यांना कर्तव्यामुळे अनेक घरगुती कार्यक्रमांकडे पाठ फिरवावी लागते. परिणामी नातेवाईकांचा पत्करावा लागणारा रोष त्यांच्यासाठी नवा राहिलेला नाही.
-----
चौकट
दृष्टिक्षेपात...
जिल्ह्यातील पोलिस- २९२१
अधिकारी-१५९
वर्दीतील दांपत्य अंदाजे- ९४
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..