
फुटबॉल
१६६३६
कोल्हापूर : के. एम. चषक फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी बालगोपाल विरुद्ध पाटाकडील यांच्या सामन्यातील एक क्षण. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)
दिलबहारची खंडोबावर मात;
पाटाकडील मंडळ बालगोपालकडून पराभूत
कोल्हापूर, ता. २१ : झुंजार क्लब आयोजित के. एम. चषक चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेत आज दिलबहार तालीम मंडळाने खंडोबा तालीम मंडळावर २-० ने विजय मिळवला. बालगोपाल तालीम मंडळाने पाटाकडील तालीम मंडळ संघावर ३-१ गोलने विजय मिळवत साखळी फेरीत प्रवेश केला.
दिलबहार विरुद्ध खंडोबा सामन्यात सुरुवातीपासून दोन्ही संघातील आघाडीच्या फळीतील खेळाडूंनी विविध चाली रचत एकमेकांची गोलक्षेत्र भेदण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ते अपयशी ठरले. उत्तरार्धात सामन्याच्या ५३ व्या मिनिटाला दिलबहारच्या सचिन पाटील याने गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ६७ व्या मिनिटाला जावेद जमादार याने आणखी एक गोल नोंदवून संघाला २-० फरकाने विजय मिळवून दिला.
बालगोपाल विरुद्ध पाटाकडील सामन्यात सुरुवात धडाक्यात झाली. पहिल्याच मिनिटात बालगोपालच्या ऋतुराज पाटील याने गोल नोंदवत पाटाकडील संघावर दडपण निर्माण केले. या गोलची परतफेड करण्यासाठी पाटाकडीलच्या खेळाडूंनी विविध चाली रचत आक्रमक खेळ केला. त्यामध्ये त्यांना अपयश आले. उत्तरार्धात सामन्याच्या ५१ व्या मिनिटाला बालगोपालच्या सूरज जाधव याने गोल नोंदवून संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. गोलची परतफेड करण्यासाठी पाटाकडीलकडून प्रयत्न झाले. ऋषिकेश मेथे-पाटील याने सामन्याच्या ५८ व्या मिनिटाला गोल नोंदवत आघाडी २-१ अशी कमी केली. सामन्याच्या ७२ व्या मिनिटाला बालगोपालच्या प्रतीक पोवार याने गोल नोंदवत संघाला ३-१ अशा आघाडीसह विजय मिळवून दिला. दिलबहारच्या जावेद जमादार आणि बालगोपालच्या प्रथमेश श्रावण यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
चौकट
निवेदकांचे कौतुक
स्पर्धेतील सामन्यांचं उत्कृष्टरीत्या निवेदन करणाऱ्या विजय साळोखे यांचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी कौतुक केले. स्पर्धा पाहण्यासाठी मैदानावर अरुंधती महाडिक, पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक, जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन निंबाळकर, क्रीडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, निखिल शहा यांनी उपस्थिती लावली.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..