इचलकरंजी पाणी प्रश्न मार्गी

इचलकरंजी पाणी प्रश्न मार्गी

Published on

17345
इचलकरंजी ः १) कट्टी मोळा डोह येथून पाणी उपसा केंद्राची अंतिम चाचणी घेताना सुभाष देशपांडे, विठ्ठल चोपडे आदी.
17346
२) पंचगंगा नदीतील कट्टी मोळा होड येथील उपसा केंद्र.
----
कट्टी मोळा डोहातून उपसा सुरू
१२ एमएलडी जादा पाणी; इचलकरंजीतील पाणीटंचाई दूर होण्यास होणार मदत
इचलकरंजी, ता. २४ ः शहराला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी पर्याय म्हणून निर्माण केलेल्या पंचगंगा नदीतील कट्टीमोळा डोहातून प्रत्यक्ष पाणी उपसा रविवारी सुरू केला. त्यामुळे शहरातील पाणीटंचाईचे संकट दूर होण्यास मोठी मदत मिळणार आहे. ही नवीन योजना कार्यान्वित झाल्यामुळे शहरासाठी १२ एमएलडी अतिरिक्त पाणी मिळणार आहे. परिणामी, शहरात आता एकदिवसआड पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही योजना मार्गी लावण्यासाठी माजी पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांनी सुरुवातीपासून पाठपुरावा केला आहे.
इचलकरंजी शहराला पंचगंगा आणि कृष्णा अशा दोन योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र कृष्णा योजनेची मुख्य जलवाहिनीला लागणारी सततची गळती आणि पंचगंगा नदीच्या वाढत्या प्रदूषणामुळे शहरातील पाणीपुरवठा सातत्याने विस्कळीत होतो. जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी पाणीपुरवठा सभापती चोपडे यांच्या संकल्पनेतून कट्टीमोळा डोहातून पाणी उपसा करण्याची पर्यायी योजना राबवण्याचा निर्णय झाला. पण ही योजना राबविण्यास अनेक अडचणी आल्या. त्यामुळे या योजनेतून ऐन उन्हाळ्यात अतिरिक्त पाणी मिळण्यास थोडासा विलंब झाला. पण पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून विविध अडचणींचा सामना करीत ही योजना पूर्ण झाली आहे.
या संदर्भात श्री. चोपडे म्हणाले, ‘कृष्णा योजनेच्या जलवाहिनीला लागणारी गळती आणि पंचगंगा प्रदूषणामुळे पाणी उपसा वर मर्यादा येऊन शहराला पाणीपुरवठा करताना अडचणी येतात. त्यामुळे चार दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करावा लागत असे. मात्र आता कट्टीमोळा डोहातून पाणी उपसा सुरू झाल्याने उन्हाळ्यातच नाही तर इतर दिवशीही एक दिवसाआड पाणीपुरवठा करता येणार आहे. प्रारंभी या योजनेसाठी तीन कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र नगरपरिषदेची आर्थिक परिस्थितीचा विचार करून आणि वीज वितरण कंपनीच्या सहकार्याने काटकसर करत ही योजना एक कोटी १६ लाखात पूर्ण केली आहे.
-----------------------
उन्हाळा सुसह्यची आशा
कृष्णा व पंचगंगा या दोन्ही ठिकाणाहून पाणी उपसा केल्यानंतरही तुटवडा जाणवत होता. त्यामुळे शहरात तीन ते चार दिवस आड पाणी येत होते. आता मात्र या योजनेतून सुमारे दहा ते पंधरा एमएलडी पाणी उपसा केला जाणार आहे. त्यामुळे पाणी टंचाईचे संकट सध्या तरी दूर होतांना दिसत आहे. त्यामुळे शहरवासीयांचा पाण्याच्या दृष्टीने यंदाचा उन्हाळा ससह्य होण्याची आशा निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com