देशाची वाटचाल उत्तर कोरियाच्या दिशेने ः तुषार गांधी
17370
देशाची वाटचाल उत्तर कोरियाच्या दिशेने
तुषार गांधी; गडहिंग्लजला ‘गांधींच्या अवकाशात’ पुस्तकाचे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २४ : गरिबांच्या घरावर बुलडोझर चालविले जात आहेत, त्यांच्या घरावर बुलडोझरच चालवायचे होते, तर बुलडोझर ड्रायव्हरलाच देशाचा पंतप्रधान केले असते. हे बुलडोझर राजकारण देशाला कोणत्या दिशेने घेऊन जाणार, याची चिंता आहे. देशात कोणाचेच अस्तित्व सुरक्षित नाही. देशाची वाटचाल उत्तर कोरियाच्या दिशेने सुरू असल्याची खंत महात्मा गांधीजींचे पणतू व सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांनी व्यक्त केली. सामान्य माणसात ताकद आहे. त्या जोरावर हा धोका रोखू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
येथील नगरपालिकेच्या शाहू सभागृहात प्रा. सुभाष कोरे यांनी संपादित केलेल्या ‘गांधींच्या अवकाशात’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. याप्रसंगी गांधी बोलत होते. विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा रत्नमाला घाळी अध्यक्षस्थानी होत्या. प्रा. एन. डी. पाटील प्रतिष्ठान, अक्षरवेध प्रकाशन, साने गुरुजी वाचनालय, अक्षर भारत वाचनालय यांच्यातर्फे हा कार्यक्रम झाला. गांधी म्हणाले, ‘‘देशाला चरख्याने स्वातंत्र्य मिळवून दिले. मात्र, त्यावेळी इंग्रजांच्या काखेत बसणारे देशप्रेमाचे धडे देत आहेत. देशातील लोकशाही धोक्यात आहे. अशा वेळी संविधानाचा एकच आधार आहे. संविधानाच्या विपरित आचरण करणाऱ्यांपासूनच लोकशाहीला सर्वात मोठा धोका आहे.’’
प्रा. सुभाष कोरे यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात पुस्तकाच्या संपादनामागील हेतू स्पष्ट केला. डॉ. सुरेश चव्हाण यांनी पुस्तकाचे परीक्षण मांडले.
अर्थतज्ज्ञ जे. एफ. पाटील, प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, श्रीमती घाळी यांची भाषणे झाली. डॉ. आनंद पाटील, अॅड. विकास पाटील, जे.बी.बारदेस्कर, कल्याणराव पुजारी, एकनाथ पाटील उपस्थित होते. किरण पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश पोवार यांनी आभार मानले.
--------------
चौकट
महात्मा नको गांधींना समजून घ्या...
गांधी म्हणाले, ‘‘महात्मा ही उपाधी लावून गांधीजींना आपण देवासमान दर्जा दिला आहे. त्यामुळे गांधीजीच सारे करू शकतात, असा दिलासा प्रत्येकवेळी स्वत:ला देत राहतो. खरे तर आपण महात्मा नाही तर गांधीजींना समजून घेण्याची गरज आहे. तरच आपल्याला मोहनदास यांचे तत्व ओळखण्याची शक्ती मिळेल. त्यातून आपली जबाबदारी समजेल.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.