चारचाकीने धडक दिल्याने एक वृद्ध महिला ठार

चारचाकीने धडक दिल्याने एक वृद्ध महिला ठार

पहाटे फिरायला गेलेली वृध्दा
मोटारीच्या धडकेत ठार
बोरवडेजवळ अपघात; सहकारी महिला गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा
बिद्री, ता. २ : सकाळी फिरावयास निघालेल्या दोन महिलांना समोरून आलेल्या भरधाव मोटारीने धडक दिली. त्यात एक वयोवृध्द महिला जागीच ठार झाली. अन्य एक गंभीर जखमी झाली. कोल्हापूर-गारगोटी राज्यमार्गावरील गोकुळच्या बोरवडे शीतकरण केंद्राजवळ आज सकाळी पावणेसहाच्या दरम्यान ही घटना घडली. यात शांताबाई नामदेव कुंभार (वय ७२, रा. बोरवडे, ता. कागल) यांचा मृत्यू झाला; तर त्यांच्यासोबत असलेल्या आनंदी आनंदा परीट (७०, रा. बोरवडे, ता. कागल) या गंभीर जखमी झाल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः शांताबाई आणि आनंदी पहाटे साडेपाच वाजता बिद्री ते मुधाळतिट्टा या दरम्यानच्या रस्त्यावर फिरावयास गेल्या होत्या. यावेळी गारगोटीहून आलेल्या भरधाव मोटारीने (एमएच ०९ जीएम ७२४३) दोघींनाही जोराची धडक दिली. यामध्ये शांताबाई सुमारे दहा फूट अंतरावर फेकल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. आनंदी यांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर मोटारचालक राकेश कुमार बाबूलाल परिहार (सध्या रा. महाडिक वसाहत, रुईकर कॉलनी, कोल्हापूर, मूळ रा. जालोरे, राजस्थान) मोटारीसह भरधाव निघून गेला. काही नागरिकांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; परंतु तो कोल्हापूरच्या दिशेने निघून गेला.
जखमी आनंदी यांना गारगोटी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शांताबाई कुंभार यांच्या मृतदेहाची मुरगूड ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी झाली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत अनिल तानाजी कुंभार यांनी फिर्याद दिली. राकेश कुमार परिहार याच्याविरोधात मुरगूड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिस वाकळे तपास करत आहेत.

ही घ्या दक्षता
० नेहमी उजव्या बाजूने चाला
> गटाने फिरणे अधिक सुरक्षित
> घरातून निघण्यापूर्वी कुटुंबातील सदस्याला माहिती द्या
> शक्य असल्यास मोबाईल फोन सोबत ठेवा
> पेहरावा चमकदार असावा किंवा एखादी रेडियमची स्ट्रीप त्यावर असावी
---------------------

फोटो ओळी :

मयत : शांताबाई कुंभार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com