

02935
महापुराच्या काळात जीव धोक्यात घालून काम करणारे आपदा मित्र. (संग्रहित छायाचित्र)
..............
आपदा मित्र-सखींना हवे ‘सुरक्षा कवच’
ना मानधन, ना सुरक्षा ः शासकीय लाभ मिळण्याची गरज
दत्तात्रय वारके ः सकाळ वृत्तसेवा
बिद्री, ता. १९ : महापूर, भूकंप, रस्ते अपघात अथवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो, या घटनांमध्ये सर्वसामान्यांचा जीव वाचविण्याचे काम आपत्ती व्यवस्थापनातील आपदा मित्र आणि आपदा सखी करत असतात. मात्र, त्यांचे काही बरे-वाईट झाल्यास त्यांना साधे सुरक्षा कवचही नाही. ना मानधन, ना सुरक्षा अशा अवस्थेत काम करणाऱ्या या स्वयंसेवकांसमोर आम्ही जगायचं तरी कसं? असा प्रश्न उभा ठाकला असून, अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हालाही शासकीय लाभ मिळावा, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.
कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून जिल्ह्यातील आपत्तीचा आढावा घेतला जातो. या प्राधिकरणाकडे खासगी स्वरूपातील सुमारे १३ स्वयंसेवी संस्थांची अधिकृत नोंदणी असून, यामध्ये जवळपास पाच हजार स्वयंसेवक आणि सुमारे ७०० आपदा सखी काम करतात. स्वयंसेवकांना जिल्हा आपत्ती कक्षाकडून प्रशिक्षण दिले जाते. बोटी चालविणे, तराफा हाकणे, दरीतील मृतदेह बाहेर काढणे, रस्ते अपघातातील जखमींना तत्काळ प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे यांसह आपत्ती काळात कराव्या लागणाऱ्या अनेक गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते.
जिल्ह्यात २००५, २०१९, २०२१ मध्ये महापुराची गंभीर स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी जीवाची बाजी लावून या स्वयंसेवकांनी विनामोबदला काम केले होते. २०१९ मध्ये देशातील पहिले ‘आपदा सखी’ पथक जिल्ह्यात तयार केले. हे सर्व स्वयंसेवक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासोबत सातत्याने काम करत आहेत. यातील तरुणींना दररोज अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते.
घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत समाजासाठी काहीतरी करण्याची ओढ असल्याने आपदा मित्र आणि आपदा सखी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षासोबत गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. मात्र, त्यांना मानधन आणि सुरक्षा कवच मिळत नाही. त्यामुळे दुसऱ्यांचा जीव वाचविणाऱ्यांच्या कुटुंबांनाच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे आता किमान मानधन आणि प्रत्येक आपदा मित्र आणि सखींना विमा सुरक्षा कवच मिळावे, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.
....
चौकट...
आपत्तीसह अन्य कामांतही हातभार
आपत्तीच्या घटनांसह शारदीय नवरात्रोत्सव, जोतिबा यात्रा आदी मोठ्या धार्मिक कार्यक्रमांतही आपदा मित्र आणि सखी विनामोबदला काम करतात. महापुरात तर प्राणाची बाजी लावून हे स्वयंसेवक बचाव कार्य करतात. बोट चालवणे, शोधकार्य करणे, प्रथमोपचार देणे, वाहतूक व्यवस्थापन करणे, गर्दीवर नियंत्रण राखणे ही जबाबदारीही ते पोलिसांच्या बरोबरीने पार पाडतात.
...
कोट...
आपदा मित्र आणि सखी यांना शासनाकडून प्रोत्साहनपर भत्ता आणि विमा कवच मिळायला हवे. याबाबत आपण वरिष्ठांकडे अनेकवेळा पाठपुरावा केला आहे. या कामी सर्वांच्याच सहकार्याची आवश्यकता आहे.
- प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.