टू ६

टू ६

लांब पल्ल्यासाठीही साधीच बस

मलकापूर आगार : आराम,एसी, शिवशाही नाहीच

अमर पाटील : सकाळ वृत्तसेवा

बांबवडे, ता. १० ः मलकापूर आगारातील प्रवाशांच्या सेवेला ३९ गाड्या आहेत त्यापैकी ३५ गाड्या दहा लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेल्या आहेत. शाहूवाडी तालुक्यातील मुंबई, पुणे, रत्नागिरी, नाशिक, अक्कलकोट असा मोठा पल्ला असलेल्या मार्गिकेवर असलेल्या गाड्या साध्या व जुन्याच आहेत. त्यामुळे मोठा पल्ला प्रवास करण्यासाठी आराम एसी किंवा शिवशाहीसारखी एकही एसटी बस नाही.
त्यातच किलोमीटरचे उद्दिष्ट गाठण्यासाठी व्यवस्थापनाकडून घातलेला घाट प्रत्यक्ष उत्पन्नावर परिणाम करणारा आहे. कारण किलोमीटर उद्दिष्ट गाठण्यासाठी लांब पल्ल्याचे नियोजन केले जाते. त्यामुळे तालुक्यात अंतर्गत फेऱ्यांवर याचा विपरीत परिणाम होतोय. लांब पल्ल्याच्या गाड्या फक्त किलोमीटरचा फुगवटा दाखवून उत्पन्न कमी होत असल्याचे जाणकार सांगत आहेत. मात्र तालुक्यातील अंतर्गत मार्गावरील फेऱ्या कमी केल्याने उत्पन्नाची खात्री असूनही याकडे व्यवस्थापन पाठ फिरवत आहे.
कोल्हापूर, कोकरुड, शित्तूर वारुण, शिराळा, इस्लामपूर, कोडोली, रत्नागिरी, लांजा अशा जवळच्या पण उत्पन्नात वाढ होऊ शकणाऱ्या फेऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. जर ग्रामीण भागातील फेऱ्या वाढल्यातर खासगी प्रवासी वाहतुकीस आळा बसून एसटीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येईल. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही याचा फायदा होईल. तर परीक्षा काळातही परीक्षार्थींना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहता येईल त्यामुळे पालकांवरील ताण कमी होईल. आरामबस गाड्या व एसी बस मलकापूर आगारात दाखल झाल्या तर मुंबई, पुणे तसेच पाचशे किलोमीटरपेक्षा जास्त प्रवासी मार्गावरील चालणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सांना पर्याय उपलब्ध होईल. एसटी आगाराकडे लोकांचा कल वाढेल.
मलकापूर आगाराची ही मरगळ दूर होणे गरजेचे आहे. त्यासाठी सुस्थितीतील बस, आराम, निमआराम बस यांची संख्यावाढ होणे गरजेचे आहे. त्यांची योग्य देखभाल व दर्जेदार सुटे भाग, प्रमाणित उपकरणे, हीसुद्धा महत्त्वाची बाब आहे. फक्त किलोमीटरचे उद्दिष्ट पूर्ण करण्यापेक्षा ज्या फेऱ्या लोकांसाठी गरजेच्या आहेत, ज्यामुळे उत्पन्न वाढीची खात्री आहे याचा विचार करुन नियोजन हवे आहे. प्रवाशांना उपयुक्त सेवा त्यांचा दर्जा, त्यांची सुरक्षितता हा प्रवाशांचा अधिकार असून प्रवासी एसटीचा आत्मा आहे. याची जाणीव ठेवून सेवा मिळाली तर प्रवासी एसटीला नेहमीच पसंती देतील. एसटी नेहमीच अग्रभागी राहील यात काहीच शंका नाही.


मलकापूर आगारात बसचे वर्गीकरण
साध्या (जुन्या) ३९
नवीन ०
निम आराम ०
एसी गाड्या ०
शिवशाही ०
एकूण बस गाड्या ३९

रोजच्या उत्पन्नाची सरासरी
प्रवास अकरा ते साडेअकरा हजार किलोमीटर
उत्पन्न - तीन ते साडेतीन लाख रुपये

महिला प्रवासी संख्या
डिसेंबर १,७१,२००
जानेवारी १,९२,४०९
फेब्रुवारी १,७९,४४२
विद्यार्थिनींसाठी पास ५००
विद्यार्थ्यांचे सवलत पास ५००

(समाप्त)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com