बोरपाडळेसह परिसरात शेतीसाठी पाणी काटकसरीची वेळ

बोरपाडळेसह परिसरात शेतीसाठी पाणी काटकसरीची वेळ
Published on

सेव्ह वॉटर क्लिपार्ट

पाणी जपूनच वापरा
पाणीपुरवठा संस्थांचे आवाहन ः दंडात्मक कारवाईचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

बोरपाडळे, ता. २७ : यंदा अपुरा पाऊस, धरणातून कमी होणारा पाण्याचा विसर्ग, परिणामी नदीपात्राची खालावलेली पाणीपातळी, वीजकपातीमुळे शेतकऱ्यांना पाण्याबाबत अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतीच्या पाणी व्यवस्थापनाबाबत पाणीपुरवठा मंडळांनी कडक धोरण अवलंबले आहे. निष्काळजीपणा केल्यास दंडात्मक कारवाईचा इशाराही दिला आहे.

यापूर्वी पाणी शेतात अन् शेतकरी घरात अशी परिस्थिती होती. बेफिकिरपणे पाण्याचा वापर व्हायचा. पण बोरपाडळेसह शहापूर, माले, मोहरे, काखे, पोखले, केखले, सातवे, आरळे आणि कोडोली गावांमध्ये बेपर्वाईला चांगलाच चाप बसल्याचे चित्र आहे. पाटाने पाणी देताना प्रत्यक्ष शेतात उभे पाणी देणे, पाणी व्यवस्थित पाजणे, विनाकारण पाणी वाया न घालवणे, नवीन लागण करताना वाकुरी न मारणे, केवळ सरीनेच पाणी देणे आदी सूचना कडकपणे दिल्या आहेत. ‘आडसाली लागणीना पाणी’ हाच फार्म्युला पाणीपुरवठा सहकारी योजनांनी अंगीकारला आहे. यामुळे गहू, हरभरा, शाळू आदी रब्बी पिकांनाही पाणी न देण्याच्या निर्णयाने शेतकरी हतबल झाला आहे. ऐन हिवाळ्यात जर अशी पाणी परिस्थिती असेल तर उन्हाळ्याची चिंताजनक राहणार यात शंका नाही. सूचना न ऐकणाऱ्या शेतकऱ्यांना दंडात्मक कारवाईचा बडगा काही संस्थांनी दाखवला आहे. शेतीसाठी पाणी कमतरता हा चिंतेचा विषय असून पाणी काटकसरीने वापरण्याचे आव्हान शेतकऱ्यांपुढे असेल.
----------
चौकट
पाणी व्यवस्थापनाचे आव्हान
नदीतील घटती पाणीपातळी, वारंवार होणारी वीजकपात यामुळे पाणीपुरवठा योजनांनी नव्या लागणीसह पाटाचे पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांपुढे पाणी व्यवस्थापन आव्हान राहणार असून प्रत्यक्ष बांधावर उपस्थित राहून पाणी द्यावे लागेल. परतीच्या पावसाने दडी मारल्याने जमिनींना भेगा पडल्या आहेत, त्यामुळे पाणी पाजताना त्रास होतो आहे. ठिबक वा तुषार सिंचनाचा पर्याय असला तरी विहिरीवरील शेतकऱ्यांना ते शक्य आहे. मात्र शेतीसाठी पाणीपुरवठा संस्थांचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने ते शक्य नसल्याचे काही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
------------------------------------------------------
कोट -
शासन आदेश, नदी पाणीपातळी पाहता पाणी व्यवस्थापनाबाबत कडक धोरण अवलंबले आहे. एकरी आठ तास पाणी राहणार असून नवीन लागणीमध्ये वाकुरी न मारता थेट सरीने पाणी द्यावे. निष्काळजीपणे पाणी देणाऱ्या संबंधित शेतकऱ्याला व कर्मचाऱ्याला दंड होणार आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा.
- सचिन जमदाडे, अध्यक्ष, कै. बापूसाहेब जमदाडे जयभवानी पाणीपुरवठा संस्था, माले

कोट -
सध्याची शेतासाठी पाटाने पाणी दिल्याने खूप वाया जाते. ठिबकमुळे पाण्याचे योग्य व्यवस्थापन राहते. भरपूर उत्पादनासाठी
ठिबकला पर्याय नाही.
- सुदीप पाटील, जलकृषिराज पुरस्कारप्राप्त शेतकरी, बोरपाडळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com