मुसळवाडीकरांनी जपले ज्ञानमंदिराचे पावित्र्य

मुसळवाडीकरांनी जपले ज्ञानमंदिराचे पावित्र्य

3345
मुसळवाडी (ता. राधानगरी) ः येथील ग्रामस्थ गावातील प्राथमिक शाळेत जाताना देवालयाप्रमाणे आपली पादत्राणे शाळेबाहेर काढून विद्येच्या मंदिराचे पावित्र्य जपतात. लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळीही ग्रामस्थानी पादत्राणे बाहेर काढून मतदानाचा हक्क बजावला. (राजू कुलकर्णी ः सकाळ छायाचित्रसेवा)
.............
मुसळवाडीकरांनी जपले ज्ञानमंदिराचे पावित्र्य

विद्यार्थी, शिक्षकांसह ग्रामस्थांचाही चपला बाहेर काढूनच वर्गात प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
शिरगाव, ता. १२ ः गावातील प्राथमिक शाळा हे सरस्वतीचे मंदिरच असते. इथे विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे आणि संस्कारांची शिकवण दिली जाते, त्यामुळेच तेथून बाहेर पडणारी पिढी जीवनात भरारी घेते. मुसळवाडी (ता. राधानगरी) येथे मात्र ग्रामस्थांनी शाळा हे सरस्वतीचे मंदिर आहे आणि त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे, असाच नवा आदर्श घालून दिला आहे. तो म्हणजे पादत्राणे शाळेच्या आवारात घालून जात नाहीत.
इंग्लिश स्कूल आणि ॲकॅडमीच्या फॅडमुळे काही गावांमध्ये लोकांचे आपल्या गावातील प्राथमिक शाळेकडे दुर्लक्ष असल्याचे जाणवते. केवळ कार्यक्रमापुरते आणि मतदानापुरते शाळेच्या आवारात गेले की झाले, असेच काहीसे चित्र प्राथमिक शाळेच्या बाबतीत पाहायला मिळते. मात्र, मुसळवाडी येथील प्राथमिक शाळा त्याला अपवाद आहे. हजाराच्या आत लोकसंख्या असलेले डोंगराच्या कुशीत वसलेले मुसळवाडी हे छोटखानी गाव. गावात अंगणवाडी ते चौथापर्यंत प्राथमिक शाळा आहे. शाळेचा परिसरही निसर्गरम्य अशा वातावरणात आहे. तिथे विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबर संस्कार आणि संस्कृतीचे धडे मिळदिले जातात.
आपली शाळा संरस्वतीचे मंदिरच आहे हे समजून येथील शिक्षक आणि विद्यार्थी आपली पादत्राणे वर्गाबाहेर काढून वर्गात प्रवेश करतात. मुलांमधील ही शिस्त पाहून येथील ग्रामस्थही भारावले आणि त्यांनीही या सरस्वतीच्या मंदिराचे पावित्र्य जपले आहे. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांबरोबर वार्षिक पारितेषिक वितरण असो वा अन्य कधीही ग्रामस्थ शाळेत जातात तेव्हा ते आपली पादत्राणे शाळेबाहेर काढून शाळेत प्रवेश करतात. गेली कित्येक वर्षे विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांनी या आदर्शाचे पालन केले आहे.
.............
निवडणुकीवेळीही पादत्राणे बाहेर
नुकतेच लोकसभा निवडणुकीचे मतदान झाले. यावेळीही ग्रामस्थांनी आपल्या चपला शाळेबाहेर काढून मतदानाचा पवित्र हक्क बजावला. यावेळीही त्यांनी लोकशाहीसाठी पावित्र्य राखल्याचे लक्षात आले.
.............
मुसळवाडी ग्रामस्थांनी विद्येच्या मंदिराचे पावित्र्य जपले आहे. चांगल्या संस्कारांसाठी ते मुलांनाही प्रोत्साहन देत आहेत. पाल्यांबरोबर येथील पालकही आपली पादत्राणे शाळेबाहेर काढतात आणि शाळेत प्रवेश करतात, हे पाहून समाधान वाटते.
के. आर. पाटील, मुख्याध्यापक, वि. मं. मुसळवाडी

.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com