भात रोप लावणीसाठी शिवारात पांढर फुलली

भात रोप लावणीसाठी शिवारात पांढर फुलली

Published on

3548
गुडाळ (ता. राधानगरी) ः राधानगरी तालुक्यात पावसाची संततधार सुरू असून, भात रोप लावणीची कामे जोरात सुरू आहेत. (राजू कुलकर्णी ः सकाळ छायाचित्रसेवा)
.......
भात रोप लावणीसाठी
शिवारात पांढर फुलली

सकाळ वृत्तसेवा
शिरगाव/कोनवडे ता. ३ ः मृग नक्षत्राने चांगली सलामी दिली आणि आर्द्राने थोडी प्रतीक्षा करायला लावल्याने राधानगरी, भुदरगड तालुक्यातील भात रोप लावणीची कामे खोळंबली होती. मात्र, गेले चार दिवस तालुक्यात संततधार पावसाला सुरुवात असल्याने खोळंबलेल्या रोपलावणीला वेग आला असून, शिवारात पांढर फुलली आहे.
राधानगरी तालुक्याच्या पश्चिम भागात तसेच भुदरगड तालुक्यातील फये, मिणचे, शेणगाव, हेदवडे, देवकेवाडी, पंडिवरे, टिक्केवाडी या पश्चिम भागातील शेतकरी भात रोप लावणीच्या कामात गुंतला आहे. भात लावणीसाठी भाताचे रोप तयार करण्यासाठी अगोदर तरवा टाकला जातो आणि पावसाचा जोर वाढला की, रोप लावणीच्या कामाला सुरुवात होते. मात्र, यंदा हे काम पावसाअभावी लांबले. रोहिणी नक्षत्रातील पेरण्या साधल्या. मृग नक्षत्राच्या पावसाने त्या तरारूनही आल्या. मात्र, काहीकाळ मृग नक्षत्राने विश्रांती घेतली आणि मृग संपून आर्द्रा नक्षत्र सुरू झाले. सुरुवातीला याही नक्षत्राने शेतकऱ्यांना प्रतीक्षा करायला लावली. त्यामुळे भात रोप लावणीची कामे खोळंबली.
परिणामी काही ठिकाणी नदी, विहिरीच्या पाण्यावर रोप लावणीच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, डोंगर माथ्यावर आणि ज्या ठिकाणी पाण्याची सोय नाही, अशा ठिकाणची रोपलावणीची कामे खोळंबून राहिली. मात्र, शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले असतानाच गेले चार दिवस मेघराजाने कृपा केली आणि संततधार सुरू केली. पाऊस सुरू झाल्याने शिवारात रोपलावणीसाठी एकच धांदल उडाली. तरवा काढणे, चिखल करणे, रोप लावणे आदी कामांसाठी शिवार पुलून गेल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
....
चौकट...
मजूर टंचाईवर फुट्टा पद्धत
ग्रामीण भागात सध्या शेतमजुरांची कमतरता जाणवत असल्याने शेतकरी गट शेती अथवा फुट्टा पद्धतीने एकमेकांना भात लावणीसाठी मदत करतात. भात रोप लावण हंगाम साधण्यासाठी ग्रामीण भागात आजही या पद्धतीचा वापर केला जातो.
...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.