धुक्याची दुलई अन् हिरवाईचा शालू हिरवाईची झालर अन् धुक्याची दुलई

धुक्याची दुलई अन् हिरवाईचा शालू 
हिरवाईची झालर अन् धुक्याची दुलई
Published on

03835
राधानगरी : सह्याद्रीच्या पर्वतरांगा हिरवाईने नटलेल्या असून, पर्यटक निसर्ग सहलीतून त्याचा आनंद घेत आहेत. बहरलेल्या पर्वतरांगांतून रामणवाडीचा कोसळणारा धबधबा. (राजू कुलकर्णी ः सकाळ छायाचित्र सेवा)
...........
धुक्याची दुलई अन् हिरवाईचा शालू

राधानगरी तालुक्यातील बहरलेला निसर्ग घालतोय पर्यटकांना साद

राजू कुलकर्णी ः सकाळ वृत्तसेवा
शिरगाव, ता. ३० ः यंदा पावसाळ्यात सर्वच नक्षत्रांनी दमदार हजेरी लावली आणि डोंगरमाथ्यावर, रानावनात आणि झाडावेलींना नवसंजीवनी मिळाली. सध्या निसर्गाने धुक्याची दुलई अन् हिरवाईचा शालू नेसल्याचे पाहायला मिळते आहे. आशा या बहरलेल्या वातावरणातील निसर्गाचे अनेकांना वेड लागते आणि पर्यटकही या निसर्गाच्या प्रेमात पडतात. आपल्या मोबाईलमध्ये निसर्गाचा नजारा कैद करतात आणि समाधानी होतात. राधानगरी तालुक्यात गावागावांपासून ते घाटमाथ्यावर जिकडे नजर टाकावी तिकडे निसर्गाचे बहरलेले वैभव पाहायला मिळत आहे. हेच बहरलेले वैभव आता पर्यटकांना साद घालत आहे.
चैत्रानंतर पावसाला सुरुवात झाली आणि डोंगरमाथ्यावर कोवळ्या गवताची उगवण झाली. उन्हाच्या तडाख्याने वाळलेल्या, करपलेल्या जागेवर बघता बघता हिरवाईचा साज चढला. पाऊस सुरू असतानाच वर्षा पर्यटनाला बहर आला. कुठे धबधबे कोसळताना, तर कुठे नदी-तलाव भरून ओसंडून वाहू लागले. त्यामुळे वर्षा पर्यटनाच्या निमित्ताने ते पाहण्यासाठी लोक गर्दी करू लागले. पानगळ झालेल्या वृक्षांना नवी पालवी फुटली, डोंगरमाथ्यावरील भातशेतीची खाचरेही भरली. विविध पक्ष्यांच्या किलबिलाटाने जंगलात एक प्रकारचे संगीतच सुरू असल्याचे ऐकायला मिळत आहे.
सारा निसर्ग हिरवाईचा शालू पांघरून आनंदाने नाचू लागला असून, त्याचे संगीत अनुभवण्यासाठी, विविध रंगांच्या दुनियेचा निसर्ग पाहण्यासाठी पर्यटक सहकुटुंब बाहेर पडू लागले आहेत. बहरलेल्या निसर्गाचे वन्यप्राणी , पशुपक्ष्यांसह फुलपाखरे, कीटक आणि पर्यटकांनाही वेड लागले आहे.
....
चौकट....
वेड निसर्गाचे
निसर्गाने राधानगरी तालुक्यावर मुक्तहस्ते सौंदर्याची उधळण केली आहे. पावसाळ्यातील इथला निसर्ग अधिकच खुलून दिसतो. असा बहरलेला निसर्ग सध्या सर्वत्र चैतन्यमय वाटू लागल्याने त्याचे वेड प्रत्येकालाच लागले आहे. या बोलक्या निसर्गासोबत आपल्या मुलांचे, कुटुंबाचे छायाचित्र टिपण्यात काही हौशी मंडळी गुंग होत आहेत. असा हा चैतन्याने भारलेला, हिरवाईने सजलेला, झाडाफुलांनी बहरलेला निसर्ग सर्वांना हवाहवासा वाटत असून, पर्यटकांची पावले आपोआपच तिकडे वळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com