पावसाची पारंपरिक नक्षत्रे आणि रुढी परंपरा

पावसाची पारंपरिक नक्षत्रे आणि रुढी परंपरा

Published on

4637
नक्षत्रावरून पावसाला ग्रामीण बोलीभाषेत वेगवेगळी नावे आहेत. त्यानुसार पाऊस पडत असतो. (राजू कुलकर्णी ः सकाळ छायाचित्रसेवा)
..............
मिरोग, अडदरा, तरणा, म्हातारा पाऊस...!

ग्रामीण भागात आजही नक्षत्रानुसार लावला जातो पावसाचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा
शिरगाव, ता. २५ ः पिढ्यानपिढ्या चालत आलेली ग्रामीण बोलीभाषा, रुढी परंपरा आजही आपल्याला पाहायला मिळतात. ग्रामीण संस्कृतीत विशेषतः शेतीच्या कामासाठी पावसाचा संबंध प्रमुख नक्षत्रांशी जोडला असला तरी त्याची ग्रामीण नावेच रूढ असलेली पाहायला मिळतात. त्या नावांबरोबर त्याचे वाहन असते. त्यानुसार पावसाचा अंदाज शेतकरी वर्तवितात आणि तो खराही ठरतो.
दरवर्षी २५ मे रोजी रोहिणी नक्षत्राने पावसाला सुरुवात होते. याकाळात वळवाचा पाऊस पडतो. याच नक्षत्रावर शेतकरी ‘रोहिणीचा पेरा आणि मोत्याचा तुरा’ असं म्हणून धूळवाफ पेरण्या करतात. ७ किंवा ८ जून रोजी मृगशीर्ष नक्षत्राला सुरुवात होते. याला मिरगाचा पाऊस किंवा ‘मिरोग’ असेही म्हटले जाते. काही ठिकाणी याला ‘वचनाचे प्रतीक’ असेही म्हटले जाते. नंतर येते ते आर्द्रा नक्षत्र. याला ‘अडदरा’ असे म्हणतात अनेकदा हा पाऊस हलका किंवा हुलकावणी देणारा असतो. यानंतर पुनर्वसू नक्षत्राला ‘तरणा पाऊस’ म्हणतात. हा पाऊस मुसळधार पडतो. पुष्य म्हणजेच ‘म्हातारा पाऊस’. या नक्षत्रावर पावसाची संततधार असते. तो शेतीसाठी उपयुक्त असतो. आश्‍लेषा या पारंपरिक नक्षत्राला ‘आसाळकाचा पाऊस’ असे नाव पडले असून याकाळात पावसाची उघडझाप असते. मघा नक्षत्राला ‘सासूचा पाऊस’ असे म्हटले जाते. ढगांच्या गडगडाटासह या नक्षत्रात पाऊस पडतो. पूर्वा फाल्गुनी या नक्षत्राला ‘सुनांचा पाऊस’ म्हणतात. तो समाधानकारक मानला जातो. नंतर येतो तो उत्तरा फाल्गुनी, याला ‘रब्बीचा पाऊस’ असे संबोधले जाते. हे नक्षत्र संपताच हस्त नक्षत्र येते. त्याला ‘हत्तीचा पाऊस’ किंवा ‘हादगा’ म्हणून ओळखले जाते. या नक्षत्रावर जोरदार पावसाची शक्यता असते. यानंतर स्वाती नक्षत्राला सुरुवात होते. ‘पडतील स्वाती, तर पिकतील माणिक मोती’ अशी म्हणही रूढ असल्याचे पाहायला मिळते. असे प्रत्येक पावसाच्या नक्षत्राला बोलीभाषेतील नावे रूढ झालेली आहेत.
..
चौकट...
वाहनावरून पावसाचा अंदाज
नक्षत्रांबरोबरच पावसाचा अंदाज त्याच्या वाहनावरूनही केला जातो. प्रत्येक नक्षत्राला एक विशिष्ट वाहन जोडलेले असते. हत्ती, बेडूक, म्हैस ही वाहनं असतील तर भरपूर पाऊस पडतो. उंदीर, गाढव, मेंढा वाहनं असतील तर कमी प्रमाणात पाऊस पडतो. मोर, कोल्हा, घोडा या वाहनावरून आलेला पाऊस मध्यम स्वरूपात पडतो. बोली भाषेतील पावसाची नावे आणि त्यांच्या वाहनानुसार पावसाचा अंदाज शेतकरी लावतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com