
ऊसतोड महिलेची आत्महत्या
ऊसतोड महिलेची
घटप्रभा नदीत आत्महत्या
इब्राहीमपूर येथील घटनाः पतीसह पाच संशयितांवर गुन्हा दाखल
चंदगड, ता. ३ ः इब्राहीमपूर (ता. चंदगड) येथे ऊस तोडणीसाठी आलेल्या राधा राजू काळे ( वय २५, मूळ रा. वडी, ता. जिंतूर, जि. परभणी) या विवाहितेने सासरकडून हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून घटप्रभा नदीत आत्महत्या केल्याची फिर्याद मृत राधाचे मामा गजानन नारायण सूर्यवंशी (रा. कमलापूर, ता. पूर्णा, जि. परभणी) यांनी पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी पती राजू त्र्यंबक काळे, सासू निलाबाई त्र्यंबक काळे, दीर विजय, टोळीचा ट्रकमालक बाळू पाटील व मुकादम विठ्ठल चव्हाण यांच्यावर येथील गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, राधा व राजू यांचे २०१९ मध्ये लग्न झाले. त्यानंतर चारच महिन्यांत कुटुंबीयांकडून ट्रॅक्टर खरेदीसाठी माहेरहून दीड लाख रुपये घेऊन ये, म्हणून तगादा सुरू होता. ते दिले नाहीत हा राग मनात धरुन तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरु होता. पती राजू, सासू निलाबाई, दीर विजय नेहमी तिला मारहाण करीत असत. परभणी येथील घरी तसेच ऊस तोडणीसाठी चंदगड तालुक्यात आल्यावर तेथील पालावरील झोपडीतही तिला मारहाण केली जात होती. त्याला कंटाळून गुरुवारी (ता.२) ती झोपडीतून बेपत्ता झाली. आज घटप्रभा नदीत तिचा मृतदेह सापडला. पती, सासू, दीर यांना ट्रकमालक व टोळी मुकादमाने सहकार्य केल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्पाल कांबळे अधिक तपास करीत आहेत.