
केरळचा अवलिया चंदगडमध्ये दाखल
02526
पारगड ः सायकलवरुन किल्ले भ्रमंतीसाठी आलेला केरळचा हमरास.
-------------------------------
केरळचा अवलिया चंदगडमध्ये दाखल
सायकलवरुन गड-किल्यांची भ्रमंती; दहा महिन्यात १४७ किल्यांना भेटी
सुनील कोंडुसकर ः सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १६ ः हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ उलटून चारशे वर्षे झाली. चौदा पिढ्या मागे पडल्या. परंतु आजही त्यांचा पराक्रम नव्या पिढीला साद घालतो आहे. छत्रपतींच्या पराक्रमाने भारावलेला केरळमधील कोटपुराम येथील हमरास हा सव्वीस वर्षीय तरुण बुधवारी (ता. १५) सायंकाळी किल्ले पारगड (ता. चंदगड) येथे दाखल झाला. आज त्याने कलानंदिगडालाही भेट दिली. १० महिने १४ दिवसांत सुमारे आठ हजार किलोमीटर प्रवास करुन त्याने १४७ किल्ले पाहिले. त्यानंतर तो कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाला.
हमरासला वाचनातून शिवाजी महाराजांविषयी आकर्षण वाढत गेले. प्रजाहितदक्ष राजा कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणून त्यांच्याविषयी मनात देवत्वाची भावना निर्माण झाली. दोन वर्षे सौदी अरेबियात मोटारचालक म्हणून काम केले होते. त्याच पैशातून गड-किल्यांची भ्रमंती करण्याचा निर्णय घेतला. १ मे २०२२ रोजी कालिकत (केरळ) येथून प्रवासाला सुरवात झाली. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, लोणावळा, नाशिक असा प्रवास करुन तो पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यात दाखल झाला. या कालावधीत आठ हजार किलो मीटरचा प्रवास आणि १४७ किल्ले पाहिल्याचे तो सांगतो.
-------------------
तंबूतच मुक्काम
प्रत्येक गड-किल्ला म्हणजे पराक्रमाची साक्ष देणारे स्फूर्तीस्तंभ आहेत. नागरीकांनी त्याचे पावित्र्य राखायला हवे. शासनानेही या गड-किल्यांचे संवर्धन करण्यासाठी खास नियोजन राबवायला हवे असे त्याचे मत आहे. दरम्यान हमरासच्या सायकलवरच तंबूचे साहित्य आहे. रात्र होईल तेथे तो तंबूतच मुक्काम ठोकतो. तेथील शिवभक्त जेवणाची व्यवस्था करतात. काल पारगडवर पोहचल्यावर प्रकाश चिरमुरकर तर आज पार्ले येथे सदानंद सिताप यांनी त्याची व्यवस्था केली. महाराष्ट्रातील नागरीक प्रेमळ आणि मदतीसाठी तत्पर असल्याने मी ठरवलेले उद्दिष्ट सहजपणे पार करीन असा त्याला विश्वास आहे.