

02904
कालकुंद्री ः संजय पाटील यांना मदतनिधी देताना आदर्श वर्गमित्र ग्रुपचे सदस्य.
-------------------------------------------------------------------------------------
अडचणीच्या प्रसंगातील ‘त्या’ वर्गमित्रांचं ‘ग्रेट टुगेदर’
प्रसंगानुसार मदतीचा हात; कालकुंद्री येथील आजारी वर्गमित्राला २२ हजारांची मदत
सुनील कोंडुसकर ः सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १६ ः अलिकडे दहावीच्या जून्या वर्गमित्रांनी एकत्र येऊन ‘गेट टुगेदर’ साजरे केले जात आहेत. व्हॉट्सअॅपने हे काम सोपे केले आहे. कालकुंद्री (ता. चंदगड) येथील सरस्वती विद्यालयातून १९९० मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या त्या वर्गमित्रांचाही ‘आदर्श वर्गमित्र’ हा ग्रुप आहे. इतक्या वर्षात त्यांना गेट टुगेदर करणे शक्य झाले नाही. परंतु वर्गमित्रांच्या अडचणीत ते ज्या आत्मियतेने सहभागी होतात, मदतीचा हात देतात त्यावरुन ते `ग्रेट टुगेदर्स` आहेत हे सिध्द होतं. नुकतेच त्यांनी संजय पाटील या वर्गमित्राला औषधोपचारासाठी २२ हजार रुपयांची मदत केली.
पंधरा दिवसापूर्वी संजयला श्वाच्छोश्वासाचा त्रास होऊ लागला. तातडीने १०८ रुग्णवाहिकेतून त्यांना गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे सीपीआरमध्ये दाखल केले. हॉटेलात काम करणाऱ्या संजय यांच्या पायाला जखम होऊन ती चिघळली होती. रक्तात साखरेचे प्रमाण वाढले होते. पत्नी, शिक्षण घेणारी तीन मुले, अत्यल्प शेती आणि तोकड्या पगाराची नोकरी यामुळे त्यांची स्थिती हलाखीची. वैद्यकीय खर्च कसा पेलायचा असा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न उभा राहिला. आपली ही व्यथा त्यांनी वर्गमित्रांच्या ग्रुपवर प्रसारीत केली. ती वाचून मित्रांची मने हेलावली. स्थानिक तसेच पुणे, मुंबईस्थित वर्गमित्रांपासून अमेरिकेत काम करणाऱ्या मित्रांनी तातडीने स्थानिक मित्रांच्या बॅंक अकाऊंटवर निधी पाठवला. एक दिवसात २२ हजार रुपये जमा झाले. स्थानिक वर्गमित्रांनी ते संजय यांची घरी भेट घेऊन त्यांच्याकडे सुपूर्द केले. यापूर्वीही अपघातग्रस्त प्रकाश कोकीतकर यांना त्यांनी अशीच मदत केली होती. कामाच्या व्यापातून त्यांना मौजमजेसाठी एकत्र येणे जमत नाही. परंतु अडचणीच्या प्रसंगात एकत्र येऊन ते आपली मैत्री ग्रेट असल्याचे दाखवून देतात. त्यांचा हा आदर्श इतरांनाही प्रेरणादायी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.