

नूलला सोमवारी धर्मजागृती सभा
नूल ः नूल (ता. गडहिंग्लज) येथील श्री सुरगीश्वर संस्थान मठाचे लिंगैक्य श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या ८८ व्या जयंतीनिमित्त सोमवारी (ता. ६) धर्मजागृती सोहळा होणार आहे. या धर्मसभेच्या निमित्ताने दिवसभर विविध कार्यक्रम होणार आहेत. सकाळी सहा वाजता श्री सुरगीश्वर समाधीला रुद्राभिषेक व लिंगैक्य चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामींच्या समाधीचे पूजन होईल. कणगला येथून आणलेल्या चंद्रज्योतीचे स्वागत करून नूल गावातून नगरप्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. यानिमित्त रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य शिबिर होणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता धर्मजागृती सभा व महाप्रसाद वाटप होणार आहे. कार्यक्रमास नूल पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मठाधीश श्री गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी केले आहे.
...........................
‘परमेश्वराचे चिंतन केल्यास मोक्षप्राप्ती’
नूल ः‘ कीर्तन म्हणजे परमेश्वराला गायनातून आळवणे, स्तुती करणे. कथा, नृत्य, अभिनय याचा सुरेख संगम म्हणजे कीर्तन. ही परंपरा जोपासून प्रत्येकाने परमेश्वराचे चिंतन केल्यास मोक्षप्राप्ती लाभते,’ असे विचार संत तुकाराम महाराज यांचे वंशज श्री गुरुप्रसाद महाराज देहूकर यांनी मांडले. यावेळी चिकोडी येथील चरमूर्ती मठाचे संपादना महास्वामी प्रमुख उपस्थित होते. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा गौरव झाला. पंचायत समिती सभापती डॉ. प्रतिभा चव्हाण, रूपाताई केसरोळी, शिवगोंडा पाटील, प्रभावती बागी, जिल्हा परिषद सदस्य अमर चव्हाण उपस्थित होते. अजित नाईक आणि प्रा. शंकर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. रावसाहेब मुरगी यांनी आभार मानले.
...................
मौजे कार्वेत ११ पासून व्याख्यानमाला
चंदगड : मौजे कारवे (ता चंदगड) येथील सरस्वती वाचनालयाच्या वतीने ११ ते १३ एप्रिलअखेर व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. दररोज सायंकाळी सात वाजता विविध वक्त्यांची विविध विषयांवर व्याख्याने होणार आहेत. व्याख्यानमालेचे हे १७ वे वर्ष आहे. व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी ‘आपल्या कला व आपली संस्कृती’ विषयावर प्रा. डॉ. एन. डी. कार्वेकर (बांदा) विचार मांडतील. यावेळी पंचायत समितीचे गटनेते पांडुरंग बेनके अध्यक्षस्थानी असतील. दुसऱ्या दिवशी ‘बदलती वाचन संस्कृती’ या विषयावर सुनीता साळुंखे मार्गदर्शन करणार आहेत. या सत्राचे अध्यक्षपद कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती विद्या पाटील भूषवतील. शेवटच्या दिवशी प्रा. डॉ. ज्योती व्हटकर (हलकर्णी) ‘महिलांनो, सक्षम आणि सावध व्हा!’ या विषयावर मार्गदर्शन करतील. सभापती विलास नाईक अध्यक्षस्थानी असतील. व्याख्यानमालेस बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वाचनालय व्यवस्थापन समितीने केले आहे.
......................
क्तृत्व स्पर्धेत ज्योती नाईक प्रथम
उत्तूर ः ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अनंतराव आजगावकर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत ज्योती नाईक हिने प्रथम क्रमांक पटकावला आदिनाथ मोरवाडकर याने द्वितीय व सई पाटीलने तृतीय क्रमांक मिळविला. प्राचार्य आर. डी. महापुरे यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरण समारंभ झाला. यावेळी शिक्षक बी. व्ही. पाटील, इंद्रजित बंदसोडे, मनोज महाडेश्वर, टी. ए. कांबळे, किरण चव्हाण, संभाजी तिबिले, उमाराणी जाधव, अलका शिंदे, कविता हनबट्टे , शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
.........................
उत्तूरला उद्या हिंदू संमेलनाचे आयोजन
उत्तूर ः हिंदू धर्म, संस्कृती व परंपरेचे जतन तसेच समाजामध्ये एकता आणि बंधुभाव वाढविण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने उत्तूर (ता. आजरा) येथे हिंदू संमेलनाचे आयोजन केले आहे. रविवारी (ता. ५) वसंतरावदादा पाटील विद्यालयाच्या प्रांगणात संमेलन होणार आहे. यावेळ पंढरपूर येथील देवव्रत महराज वास्कर, नृसिंहवाडी येथील शरददत्त दास बुवा घाग, वेदशास्त्रसंपन्न डॉ. के. डी. हिरेमठ, आकाराम महाराज पोवार, स्वामी शिवयोगी नाथ महाराज, गुरुवर्य किसन महाराज, तानाजी पाटील उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. यानिमित्त दुपारी स्वागत कमान ते इंदिरानगर या मार्गावरून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. संमेलनासाठी उत्तूर आणि परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावेस असे आवाहन आयोजकांच्या वतीने केले आहे.
.....................
महिला मेळाव्याला लकीकट्टेत प्रतिसाद
चंदगड : लकीकट्टे (ता. चंदगड) येथे कोकण विकास सोसायटी व दिशा सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित महिला मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावातील मंदिराच्या सभागृहात झालेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुधा मुंगारे होत्या. पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. विद्या तावडे यांनी, ग्रामीण भागातील महिलांमध्ये असलेली क्षमता ओळखून त्यांना योग्य व्यासपीठ मिळाल्यास त्या निश्चितच आपले कर्तृत्व सिद्ध करू शकतात, या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन केल्याचे सांगितले. यावेळी संस्थेचे समन्वयक राजेंद्र कांबळे, रेवती वाणावलकर, संजीवनी पाटील, दयानंद कांबळे आणि अनिता पाटील यांनी महिलांना विविध सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विषयांवर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात सरपंच सुधा मुंगारे यांनी ग्रामीण भागातील महिलांना योग्य दिशा व प्रेरणा देण्यासाठी अशा मेळाव्यांची गरज अधोरेखित केली. मेळाव्यानंतर महिलांसाठी धावणे व वजन उचलण्याच्या स्पर्धा झाल्या.
...................
5906
उत्तूर ः येथील बसस्थानकात एनसीएमसी कार्ड वितरित करताना एसटीचे अधिकारी.
उत्तूरला एनसीएमसी कार्ड नोंदणी सेवा सुरू
उत्तूर ः येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सवलतीसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) नोंदणी सेवा सुरू झाली आहे. आधार कार्डवरील चुकीच्या जन्मतारखा, अपूर्ण माहिती, प्रत्यक्ष वयाशी विसंगती यामुळे अपात्र व्यक्तींनाही सवलत मिळत होती. परिणामी, एसटी महामंडळावर आर्थिक ताण वाढण्यासह पात्र प्रवाशांवर अन्याय झाला होता. यावर
उपाय म्हणून शासनाने एनसीएमसी कार्ड प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्डद्वारे प्रवाशांची डिजिटल ओळख निश्चित होणार असून, सवलतीचा लाभ केवळ पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे. ही प्रणाली एसटी सेवेत अधिक पारदर्शकता आणि विश्वासार्हता निर्माण करणार असल्याचे वाहतूक निरीक्षक अनिल पाटील, आगार व्यवस्थापक प्रवीण पाटील यांनी सांगितले.
....................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.