मसाई पठारावर रानफूलांचा रंगोत्सव

मसाई पठारावर रानफूलांचा रंगोत्सव
Published on

देवाळे ः मसाई पठार विविध फुलांनी बहरले आहे.

00684; 00685
मसाई पठारावर रानफुलांचा रंगोत्सव
पुष्पसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी; वन, पोलिसांचा बंदोबस्त

उत्तम महाडिक ः सकाळ वृत्तसेवा

देवाळे, ता. ३० ः ऐतिहासिक व नैसर्गिक महत्त्व लाभलेल्या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पन्हाळ्याच्या डोंगरमालेशी संलग्न असणारे व जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांमधील टेबल लँड असणारे विस्तीर्ण मसाई पठार रंगीबेरंगी रानफुलांनी बहरले आहे. हिरव्यागार गवताच्या मऊ गालीच्यावर विविध रानफुलांचे रंगीबेरंगी ताटवे पर्यटकांना भुरळ घालत आहेत. पठारावरील ऊन-सावलीचा पाठशिवीचा खेळ, मध्येच येणारी पावसाची सर, अंगाला झोबणारा वारा आणि हिरव्यागार विस्तीर्ण पठारावर मुक्त रंगांची उधळण करणारी रानफुले म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे.
पठारावर आढळणाऱ्या रानफुलांमध्ये ड्रोसेरा, रानतेरडा, नीलिमा, नीलचिराईत, केना, रानहळद, रानकोथंबिरी, सफेद मुसळी, नीलवंती, सीतेची आसवे, मिकीमाऊस, अग्निशिखा, स्मिथीया याबरोबरच निळ्या रंगाच्या भारंगीची फुले आढळून येतात. मसाई पठार जांभ्या व काळ्या खडकापासून बनल्याने खडकावर फुलणारी भुईआमरीच्या (ग्राउंड ऑर्किड) सहा ते सात प्रजाती आढळतात. दुर्मिळ वनस्पती व रानफुलांबरोबरच पांढऱ्या फुलांची दीपकाडी, कापरू ड्रोसेराच्या अनेक प्रजातींबरोबर दाट झुडपांत आढळणारे जंगली सुरण (सापकांदा) लक्ष वेधून घेतात. पठारावर फिरायला आलेल्या पर्यटकांपैकी काही अतिउत्साही जैवविविधतेचे नुकसान करतात. तसेच हुल्लडबाजी, छेडछाडीचे प्रकारही घडतात. त्यामुळे जैवविविधतेचे नुकसान करणाऱ्या हुल्लडबाज व स्टंटबाजावर कारवाईसाठी पठारावर वन विभाग पन्हाळा व पोलिस प्रशासनाची गस्त सुरू आहे.

चौकट -
कारवीही बहरली
पठाराच्या परिसरात आढळणारी व दर सात वर्षांनी फुलणारी कारवीही फुलांनी बहरली आहे. त्यामुळे पठाराच्या दक्षिणोत्तर असणाऱ्या उतारावरील जंगल निळ्या, गुलाबी रंगांनी न्हाऊन निघाले आहे.

चौकट -
पठारावर काय पाहाल...

मसाई देवीची मुख्य मंदिरे
पांडवदरा येथील गुहा, बारद्वारी
दऱ्यांमध्ये असणारे पाण्याचे झरे
दरीतील छोट्या-मोठ्या गुहा
शाहूकालीन चहाच्या मळीचा परिसर
म्हाळुंगेशेजारी उभारलेला ॲडव्हेंचर पार्क

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com