स्मशान शेडविना मृत्युनंतरही परवडच...
स्मशान शेडविना मृत्यूनंतरही परवडच
पन्हाळा तालुक्यांत वाड्या-वस्त्यावरील परिस्थिती; लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज
उत्तम महाडिक ः सकाळ वृत्तसेवा
देवाळे, ता. १८ ः मृत्यू व्हावा तर तो कोल्हापुरात, असे म्हटले जाते. कारण मृत्यूनंतर अंत्यविधीची कोल्हापूरची परंपरा अतिशय संवेदनशील, सर्व सोयीनिशी व मोफत आहे. मग तो गरीब असो वा निराधार, त्याचा विधिवत अंत्यविधी कोल्हापूरमध्ये होणारच. याच जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील डोंगराळ भागातील वाड्या-वस्त्यांवर आजही मृत्यूनंतर स्मशानशेडअभावी अंत्यसंस्कारासाठी परवड होत आहे.
मनुष्याच्या जीवनातील सर्वात शेवटचा सोपस्कर म्हणजे अंत्यसंस्कार. मृत्युमुखी झालेल्यावर योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार व्हावा, यासाठी नातेवाईकांची धडपड असते. पण या वस्त्यांवर मयत झालेल्या व्यक्तीचे अंत्यविधी आपापल्या शेतजमिनीत करतात. त्यामुळे उन्हाळ्यात एखादी व्यक्ती मयत झाल्यास फारशी अडचणही येत नाही. हा परिसर डोंगराळ असल्याने पावसाळ्यात पावसाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पावसाळ्यात अशी घटना घडल्यास मोठी कसरत असते. चिखलातून, शेतात असणाऱ्या पिकातून तसेच चिंचोळ्या बांधावरून वाट काढत मोठे दिव्य पार करून मृतदेहाचे दहन करावे लागते. शेडअभावी लाकडे ओली होतात. परिणामी, मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत राहिल्याने मृतदेहाची विटंबना होते. दहन पूर्ण होईपर्यंत नातेवाईकांबरोबरच गावकऱ्यांना मोठ्या अग्निदिव्यातून जावे लागते. त्यामुळे याचा लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. तरच मृत्यूनंतरची वाड्यावस्त्यांवर होणारी परवड थांबणार आहे. कारण जिल्ह्यातील डोंगराळ भागांत असणाऱ्या वाड्यावस्त्यांवर हीच परिस्थिती आहे.
चौकट
१० गावे, ३४ वाड्या-वस्त्या वंचित
पन्हाळा तालुक्यात १११ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायत असणाऱ्या मुख्य गावांना लहान-मोठ्या ३५ वाड्या जोडल्या आहेत. त्यापैकी १०१ मुख्य गावांमध्ये स्मशानशेड उपलब्ध आहेत. उर्वरित अजूनही १० गावांत व ३४ इतक्या वाड्या-वस्त्यांवर अद्याप स्मशान शेडच नाही. तर अनेक गावांतील स्मशानशेड नादुरुस्त आहेत. अनेक गावांत तांत्रिक अडचणी आहेत तर अनेक ठिकाणी शासनाचे नियम आडवे येत आहेत. त्यामुळे याचाही विचार शासनस्तरावर होणे फार गरजेचे आहे.
कोट -
पावसाळ्यात एखादी व्यक्ती मयत झाल्यास मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते. त्यामुळे लहान वाड्या-वस्त्यांवरही शासनाकडून स्मशान शेडची व्यवस्था व्हावी.
- जयवंत खेतल, ग्रामस्थ, तुरूकवाडी (ता. पन्हाळा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.