

मसाई पठार परिसरात बिबट्याची दहशत
सलग दोन दिवस हल्ले; वन विभाग लावणार ट्रॅप कॅमेरे
सकाळ वृत्तसेवा
देवाळे, ता. ४ ः मसाई पठार परिसरात दोन दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या आणि एक रेडी ठार झाली. सलग दोन दिवस घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांत घबराट निर्माण झाली असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. दरम्यान दोन दिवसात वनविभागातर्फे जंगल परिसरात उर्वरित ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार असून, परिसरातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन पन्हाळा वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
याबाबत घटनास्थळावरून आणि वन विभागाकडून मिळालेली माहिती अशी, मसाई पठार परिसरात बिबट्याचा नियमित वावर आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्या मानवी वस्तीत भक्ष्याच्या शोधात येत आहे. जेऊर (ता. पन्हाळा) येथील शामराव अण्णा पाटील यांच्या शेतातील घरात रात्री दोनच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात गोठ्यातील बकरी बिबट्याने ठार केली. वेखंडवाडी (ता. पन्हाळा) येथील शिवाजी सुभाना खोत यांच्या गोठ्यात शिरून बिबट्याने रेडकू फस्त केले. तत्पूर्वी शनिवारी रात्री बादेवाडी येथील सदाशिव दाजी गवड यांच्या शेळीवर हल्ला करून बिबट्याने तिला ठार मारले. तर परिसरात मागील महिनाभरात बिबट्याकडून रेडकू, वासरू व शेळ्यांचा फडशा पाडला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांत घबराट पसरली आहे. यावेळी पन्हाळा वनपरिक्षेत्राचे वनपाल सागर पटकारे, वनरक्षक संदीप पाटील आर. आर. टीमचे रोहित जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली.
चौकट
सलग दोन दिवस हल्ले
सलग दोन दिवसांत बिबट्याने तीन ठिकाणी हल्ला करून तीन प्राण्यांना ठार केल्याने परिसरात खळबळ उडाली. पन्हाळा बांधारी परिसरात नेहमीच बिबट्याचा वावर असून गेल्या काही दिवसात बिबट्याचा मानवी वस्तीतील वावर वाढला आहे. सतत घडणाऱ्या घटनांमुळे व जनावरांच्या गोठ्यात येऊन जनावरावर हल्ले होत असल्यामुळे या परिसरातील नागरिक मात्र भयभीत झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.