
जोगमवाडी येथे दहा वीज खांब सडले
0993
जोगमवाडी ः येथे सडलेले वीज खांब
...
जोगमवाडीत विजेचे दहा खांब सडले
धामोड : म्हासुर्ली पैकी जोगमवाडी (ता. राधानगरी) येथील विजेचे दहा लोखंडी खांब गंजले असून याकडे वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष केले आहे. येथील ग्रामपंचायतीने सडलेले लोखंडी काम त्वरित बदलावेत, याबाबतचे निवेदन सातत्याने देऊन देखील वीज वितरण कंपनीने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे वीज कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्याचा पवित्रा येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. म्हासुर्ली - कळे या मार्गावर जोगमवाडी येथील वीज वितरण कंपनीचे सुमारे दहा लोखंडी खांब गेल्या चार वर्षांपासून गंजलेले आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. येथील ग्रामपंचायतीने सडलेले वीज खांब त्वरित बदलावेत, यासाठी कळे सबस्टेशनला वारंवार निवेदने दिली आहेत .तरी देखील वीज वितरण कंपनीकडून याबाबत चालढकल केली जात आहे. याबाबत म्हासुर्लीचे उपसरपंच राजेंद्र पाटील म्हणाले,‘ सडलेले खांब त्वरित बदलावेत, यासाठी गेल्या दोन वर्षांपासून कळे वीज स्टेशनला ग्रामपंचायतीमार्फत पत्रव्यवहार सुरू आहे. मात्र याची दखल वीज वितरण कंपनीने घेतलेली नाही. एखाद्याचा जीव गेल्यानंतरच वीज कंपनीला जाग येणार का?’
.....
कसबा तारळे यात्रोत्सवात आज मशाल प्रज्वलन
कसबा तारळे : येथील देवी श्री विठ्ठलाईच्या यात्रोत्सवाला होळी पौर्णिमेपासून प्रारंभ झाला असून यात्रोत्सवात मानाचे स्थान असलेल्या पवित्र मशालीचे प्रज्वलन सोमवारी (ता.१३) रात्री अनुराधा नक्षत्राच्या मुहूर्तावर होणार आहे. त्या रात्रीपासूनच करमणुकीच्या कार्यक्रमांनाही सुरुवात होणार आहे. होळी पौर्णिमेपासून पंधरा दिवस सुरू राहणाऱ्या या यात्रोत्सवात रोज रात्री विना मशाल गाऱ्हाण्याचा फेरा निघत आहे. सोमवारी सकाळी ग्रामदैवत मारुती मंदिरासमोरील पवित्र मांडावर मुहूर्तमेढीचे पूजन होणार असून त्या रात्री मशाल प्रज्वलनानंतर या पवित्र मशालीच्या उजेडात गाऱ्हाण्याच्या फेऱ्यांना सुरुवात होईल. पारंपरिक ताशा, ढोल व मातीच्या भांड्यांचे चर्मवाद्य आणि टाळ-चिपळ्यांच्या तालात देवीची महती सांगणारी गाणी सादर करीत गाऱ्हाण्याचे फेरे निघतील. सोमवारपासून या फेऱ्यासमोर स्थानिक लेझीम पथके आपला फेर धरतील व लेझीम कला सादर करतील. देवी श्री विठ्ठलाईच्या मंदिरासमोर भाविकांची गाऱ्हाणी (नवस) श्री गैबी-विठ्ठलाई खेळे मंडळामार्फत (यात्रोत्सव पारंपरिक समिती) घातली जातील. रात्री मारुती मंदिरासमोरील गावहोळी जवळ हा गाऱ्हाण्याचा फेरा भाविकांसह पोहोचेल. तेथे या गाऱ्हाण्यांना यश येऊ दे,अशा आशयाची ग्रामदैवत श्री मारुतीला सामुदायिक प्रार्थना करून खेळे मंडळाचे मानकरी पवित्र मांडावर येतील. तेथे देवदेवतांची महती सांगणारी गाणी झाल्यानंतर करमणुकीच्या कार्यक्रमांना सुरुवात होईल.