तुळशी धरणावरील विश्रामगृहाला ‘अवकळा ’

तुळशी धरणावरील विश्रामगृहाला ‘अवकळा ’

01571, 01572, 01573

धामोड (ता. राधानगरी) ः येथील तुळशी धरणावरील शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीची झालेली दुरवस्था. दुसऱ्या छायाचित्रात बागेत असलेला कारंजा बंद असून, त्याची दुरवस्था झाली आहे. तिसऱ्या छायाचित्रात विश्रामगृहाच्या बागेसमोर दारूच्या बाटल्यांचा पडलेला खच. (छायाचित्र : केरबा जाधव )

तुळशी धरणावरील विश्रामगृहाला
‘अवकळा ’

मद्यपींमुळे बाग बनली ‘ओपन बार’; दुरवस्थेमुळे पर्यटकांनी फिरवली पाठ

केरबा जाधव ः सकाळ वृत्तसेवा
धामोड, ता. १४ : येथील तुळशी धरणावरील शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीची दुरवस्था झाली असून, गेल्या सात महिन्यांपासून ते बंद अवस्थेत आहे. या ठिकाणी पाटबंधारे विभागाचा एकही कर्मचारी कार्यरत नसल्याने विश्रामगृह ओस पडले आहे. विश्रामगृहासमोरील बाग म्हणजे जणू ‘ओपन बार’ बनला आहे. येथे मद्यपी दारू पिऊन धिंगाणा घालतात तसेच बागेत बाटल्यांचा खच पडला आहे. बागेत जनावरे चरण्यासाठी सोडली जातात, त्यामुळे बागेसह विश्रामगृहाला अवकळा प्राप्त झाली आहे.
राधानगरी तालुक्याच्या पश्चिम परिसरातील तुळशी धरण हे जिल्ह्यात शांत व नीरव म्हणून परिचित आहे. गेल्या दहा वर्षांपासून हे धरण पिकनिक पॉईंट म्हणून नव्याने विकसित होत आहे. तसेच जिल्ह्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचा तो केंद्रबिंदू बनले आहे. दर रविवारी पर्यटकांमुळे येथे हाउसफुल्ल गर्दी असते. सध्या येथील सनसेट पॉईंट पाहण्यासाठी पर्यटकांची सायंकाळी मोठी गर्दी होते.
धरणाशेजारीच असणाऱ्या शासकीय विश्रामगृहाकडे पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याने इमारतीची दुरवस्था झाली आहे. एकेकाळी या विश्रामगृहावर लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांची सातत्याने रेलचेल असे. इमारतीच्या अंतर्गत असणाऱ्या भौतिक सुविधा उपलब्ध नसल्याने गेल्या सात महिन्यांपासून विश्रामगृह बंद आहे. त्यातच या ठिकाणी कार्यरत असणारा कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यापासून नवीन कर्मचाऱ्याची नियुक्ती केलेली नाही. पर्यटकांनी याकडे पाठ फिरवली असून, शासकीय विश्रामगृहासमोर असणाऱ्या बागेत सध्या मद्यपींचा वावर वाढला असून, सर्वत्र दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे येथील विश्रामगृहाची ओळख ‘मद्यपींचा अड्डा’ अशी बनत चालली आहे. येथे सुरक्षारक्षक नसल्याने विश्रामगृहाच्या बागेसमोर जनावरे चरण्यासाठी सोडली जातात. एकेकाळी येथील बागेमध्ये कारंजा उभारला होता. त्यामुळे बागेचे सौंदर्य खुलून जात होते. मात्र, कारंजाची देखभाल दुरुस्तीअभावी दुरवस्था झाली असून, तो बंद अवस्थेत आहे.
........
कोट...
तुळशी धरणाचे सौंदर्य म्हणून परिचित असलेल्या शासकीय विश्रामगृहाची दुरवस्था झाली असून, पडझड सुरू आहे. शासनाने येथे कायमस्वरूपी सुरक्षा कर्मचारी नेमणे गरजेचे आहे. विश्रामगृहाला गतवैभव प्राप्त करून द्यायला हवे.
चंद्रशेखर तेली, ग्रामस्थ, धामोड
...
कोट...
शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीच्या होत असलेल्या पडझडीबाबत शासनाला कळविले आहे. वरिष्ठ पातळीवरून आदेश मिळताच विश्रामगृहाच्या दुरुस्तीबाबत कार्यवाही केली जाईल.
अंजली कारेकर, शाखा अभियंता, तुळशी धरण
................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com