म्हासुर्ली आरोग्य केंद्रात पदे रिक्त

म्हासुर्ली आरोग्य केंद्रात पदे रिक्त
Published on

२१ गावांतील आरोग्यसेवेचा
भार चौघा कर्मचाऱ्यांवरच

म्हासुर्ली आरोग्य केंद्रातील स्थिती

सकाळ वृत्तसेवा

धामोड, ता. २ : म्हासुर्ली (ता. राधानगरी) येथे दोन वर्षांपूर्वी शासनाने कोट्यावधींचा निधी मंजूर करून उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची वानवा आहे. त्यामुळे २१ गावांतील रुग्णांची हेळसांड होत आहे. शासनाने येथे त्वरित कर्मचाऱ्यांची भरती करावी; अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
तालुक्याचा पश्चिम म्हासुर्ली परिसर दुर्गम व डोंगराळ आहे. भौगोलिकदृष्ट्या धामोड प्राथमिक आरोग्य केंद्र या परिसराला रुग्णसेवेसाठी अडचणीचे ठरत आहे. येथील २१ गावांसाठी ४ कोटी ८० लाख रुपये निधी खर्च करून दोन वर्षांपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभारली. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा थाटात झाला. पण सध्या येथील आरोग्य केंद्राचा कारभार चार कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे रुग्णांना समाधानकारक आरोग्यसेवा मिळणे खूपच जिकिरीचे बनले आहे. हा परिसर जंगलव्याप्त आहे. त्यामुळे सातत्याने येथे सर्पदंश, श्वानदंश व वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटना घडत असतात. महिला प्रसूतीचे प्रश्नदेखील गंभीर आहेत. धामोड प्राथमिक आरोग्य केंद्र दळणवळणाअभावी व भौगोलिकदृष्ट्या अडचणीचे असल्याने उपचारासाठी येथील रुग्ण ७० किमी अंतरावरील कोल्हापूरला जातात. त्यामुळे येथे दोन वर्षांपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत बांधली आहे. मात्र, येथे चौघांवरच कारभार सुरू आहे.


इमारत उभारणी खर्च - ४.८० कोटी
कार्यक्षेत्रातील गावे - २१
एकूण कार्यरत पदे - ४
एकूण आवश्‍यक पदे - ११

कोट
म्हासुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी शासन स्तरावरून सेवार्थ आयडी मिळाला नसल्याने कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करता आलेली नाही. येथे वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका व शिपाई असे चौघे कार्यरत आहेत. २१ गावांना रुग्णसेवेसाठी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी शासन स्तरावरून ११ पदे निश्चित केली जातात. येथे कर्मचाऱ्यांची नियुक्तीयासाठी पाठपुरावा सुरू आहे.
- राजेंद्र कुमार शेटे, तालुका आरोग्य अधिकारी, राधानगरी

शासनाने येथे सुसज्ज इमारत उभी केली आहे. मात्र कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने रुग्णांना सेवा मिळताना अडचणी येत आहेत. शासनाने येथे त्वरित कर्मचाऱ्यांची भरती करावी.
- सरदार कांबळे, उपसरपंच, कोनोली तर्फ असंडोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com