
दुर्गवीर त्रस्त
ओल्या पार्ट्यांनी दुर्गवीर त्रस्त
सामानगड : शिवजयंतीलाच द्यावा लागला रात्रभर पहारा
गडहिंग्लज, ता. २० : जगभर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंतीचा गजर सुरु असताना दुर्गवीरच्या मावळ्यांना येथील सामनागडावर पहारा देण्याची वेळ आली. ज्योत आणण्यासाठी आलेल्या मंडळानी गडावर ओल्या पार्ट्यासाठी चुली पेटविल्याने अस्वच्छता झाली. गडावरील झाडाझुडपांना आग लागू नये यासाठी धावपळ करावी लागली. परिणामी, ओल्या पार्ट्यांना अटकाव करण्यासाठी दुर्गवीरांना रात्र जागवावी लागली.
सात वर्षांपासून सामानगड संवर्धंनासाठी दुर्गवीर प्रतिष्ठान कार्यरत आहे. दर रविवारी दुर्गवीरचे मावळे सकाळच्या सत्रात श्रमदानातून सामानगडाचे वैभव जपण्यासाठी मेहनत घेतात. त्यामुळेच सात कमान विहिरीसह अनेक प्रेक्षणीय स्थळांना चांगले स्वरूप आले. काही उपद्रवी युवकांकडून या संवर्धनाला गालबोट लावण्याचे प्रकार वाढले आहेत.
शिवजयंतीला रात्री ज्योत नेण्यासाठी आलेल्या मंडळांनी ओल्या पार्ट्या करून अस्वच्छता केली. आठ ते दहा ठिकाणी चुली पेटविल्या होत्या. याचा सुगावा लागताच दुर्गवीर गडावर पोचले. अशा पार्ट्या करणाऱ्या य़ुवकांना हुसकावून लावले. या आगीचा लगतच्या झाडाझुडपांना वणवा लागू नये म्हणून कसरत करावी लागली.
दरम्यान, प्रजासत्ताकदिनी परगावच्या चालकांनी वाहने गडावरील भगव्या झेंड्याभोवती लावल्या होत्या. प्रबोधन रॅलीनिमित्ताने एकत्र आलेल्या या युवकांनी कठड्यावर चढून नृत्य केले. त्यामुळे गडाच्या पावित्र्याला धक्का बसला. अशा उपद्रवी कृत्यांवर पोलिसांनीच वचक लावावा, अशी दुर्गवीर प्रतिष्ठानची मागणी आहे.
कोट..
एकीकडे शिवाजी महाराजांचा जयघोष करायचा. त्याच महाराजांच्या किल्ल्यावर ओल्या पार्ट्यांसह अनैतिक प्रकार करून परिसर अस्वच्छ करण्याचा प्रकार वेदनादायक आहे. यामुळे संर्वधनाच्या प्रयत्नांना अटकाव होत आहे.
- कैलास परीट (दुर्गवीर),
चिंचेवाडी ता. गडहिंग्लज