नव्या ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाची संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नव्या ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाची संधी
नव्या ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाची संधी

नव्या ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाची संधी

sakal_logo
By

89050
--------------------------------
नव्या ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाची संधी
बाजार समिती : सोमवारी अंतिम मतदार यादी, राजकीय हालचाली वेगावणार
दीपक कुपन्नावर : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १४ : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. ग्रामपंचायत, सेवा संस्था, अडते व व्यापारी आणि हमाल तोलारी अशा चार गटांत एकूण ८ हजार ४६८ मतदार आहेत. सोमवारी (ता. २०) अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. तब्बल साडे तीन तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या बाजार समितीच्या अंतिम मतदार यादीनंतर राजकीय हालचाली वेगावण्याची अपेक्षा आहे.
कोरोना आणि इतर कारणांमुळे ही निवडणूक तब्बल अडीच वर्ष विलंबाने होत आहे. मुदत संपल्याने शासन नियुक्त जम्बो प्रशासक मंडळ कार्यरत होते. यापूर्वी दोनदा ही निवडणूक जाहीर होऊन स्थगित झाली होती. बाजार समितीचे गडहिंग्लज, आजरा, चंदगड आणि कागल तालुक्यातील ३७ गावांचे कार्यक्षेत्र आहे. अमृत महोत्सवाकडे वाटचाल करणारी समिती विविध कारणांनी गेले दोन दशके संकटात आहे. परिणामी, गूळ, मिरची आणि जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या समितीचा कणा कर्मचारीच दोन वर्षांपासून पगाराच्या प्रतीक्षेत आहेत. यावरून बाजार समितीच्या डबघाईला आलेली आर्थिक स्थिती कळेल.
कार्यक्षेत्रातील सेवा संस्था, ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकातील ग्रामपंचायतीच्या नव्या सदस्यांना यात मतदानाची संधी आहे. यामुळे समितीत १२८ मतदार वाढले आहेत. त्याचबरोबर समितीचे घटक असणारे नोंदणीकृत व्यापारी, अडते आणि हमालांचे प्रतिनिधीही निवडले जाणार आहेत. भौगोलिकदृष्ट्या मोठ्या असलेल्या चंडगड तालुक्यात सर्वाधिक सुमारे सव्वा दोन हजार मतदार आहेत. पाठोपाठ गडहिंग्लज दोन, आजरा अठराशे तर कागल तालुक्यात कमी म्हणजेच अकराशे मतदार आहेत.
सेवा संस्था गटातून सर्वाधिक ११ संचालक निवडले जातील. त्या पाठोपाठ ग्रामपंचायत गटातून चार संचालक आहेत. व्यापारी, अडते गटातून दोन, तर हमाल तोलारी गटातून एक प्रतिनिधी निवडला जाईल. एकूण १८ संचालक निवडले जातील. विविध कारणांमुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका यांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने स्थानिक राजकीय क्षेत्रात शांतता आहे. बाजार समितीच्या निवडणुकीने हे चित्र पालटणार आहे.
---------------
मतदार दृष्टिक्षेपात
मतदार संख्या
विकास संस्था गट ४८९५
ग्रामपंचायत गट २७२९
अडते व्यापारी ६९७
हमाल तोलारी १४७