खेळातून जीवन कौशल्याचा विकास

खेळातून जीवन कौशल्याचा विकास

81070
गडहिंग्लज : युनायटेडच्या उन्हाळी फुटबॉल प्रशिक्षण शिबिरातील उत्कष्ट प्रशिक्षणार्थींचा सत्कार करताना हर्षवर्धन बी. जे. सोबत संदीप कांबळे, महादेव पाटील, सुरेश कोळकी, मल्लिकार्जुन बेल्लद.
...............

खेळातून जीवन कौशल्याचा विकास

हर्षवर्धन बी.जे. : युनायटेड उन्हाळी फुटबॉल प्रशिक्षण शिबिराचा समारोप

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २ : ‘आज सर्वच पालक पाल्याने अभ्यासाच्या टक्केवारीत पुढे जावे यासाठी धडपडत आहेत. त्यामुळे पाल्यावर शैक्षणिक ताण येण्यासह अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. मात्र, जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ वर्गातील शिक्षण पुरेसे नाही. तुलनेत मैदानी खेळ विद्यार्थ्यांना वर्गातील अभ्यासापेक्षा अधिक जीवन कौशल्ये शिकवितात,’ असे प्रतिपादन प्रशिक्षणार्थी आयपीएस पोलिस अधिकारी हर्षवर्धन बी. जे. यांनी केले.
येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि श्री. रावसाहेबआण्णा कित्तूरकर विश्वस्त संस्थेमार्फत मोफत फुटबॉल प्रशिक्षण शिबिराच्या समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. गेले बारा दिवस एम. आर. हायस्कूलच्या मैदानावरील शिबिरात १५० नवोदितांनी सहभाग घेतला. युनायटेडचे सचिव दीपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात शिबिरातील उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी उत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून हमझा रिझवी, सोहम धुमाळ, आरोही कांबळे, कैवल्य वाटवे यांचा हर्षवर्धन यांच्या हस्ते क्रीडा साहित्य देऊन सत्कार झाला.
हर्षवर्धन म्हणाले, ‘सध्याच्या स्पर्धेच्या युगात अनेक आव्हाने आहेत. त्यांना सामोरे जाताना अनेकदा अपयश येण्याची शक्यता आहे. मात्र, अपयशातून उभारी घेण्याची मानसिकता केवळ खेळातून निर्माण होते.’
यावेळी शिबिर समन्वयक सुल्तान शेख, सागर पोवार यांचा सत्कार करण्यात आला. गडहिंग्लज युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जुन बेल्लद, संचालक सुरेश कोळकी, खजिनदार महादेव पाटील, संदीप कांबळे, तानाजी देवेकर, ओमकार घुगरी, अनिकेत कोले, प्रसाद पोवार, श्रवण पाटील यांच्यासह खेळाडू, पालक उपस्थित होते. यश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
......
चौकट...
मैदानात खेळा..व्याधी पळवा
नवी पिढी मैदानापासून दुरावू लागल्याने तरुण वयातच अनेक व्याधी जडत आहेत. त्यासाठी नवोदितांनी बालपणापासून मैदानात खेळत व्याधी दूर पळवाव्यात. त्यामुळे पालकांनी अभ्यासाप्रमाणेच पाल्याच्या आरोग्यासाठी जागरूक राहून किमान रोज एक तास मैदानावर त्याला खेळण्यासाठी प्रोत्साहन द्या, असे आवाहन हर्षवर्धन यांनी केले.
.....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com