जनावरांच्या बाजारातून बैलजोडी गायब

जनावरांच्या बाजारातून बैलजोडी गायब

gad313.jpg
87026
गडहिंग्लज : बाजार समितीतील बैल बाजाराचे संग्रहित छायाचित्र.
--------------------------------
जनावरांच्या बाजारातून बैलजोडी गायब
यांत्रिकीकरणाचा परिणाम : वर्षभरापासून बाजार समितीत एकही बैलजोडी नाही
दीपक कुपन्नावर : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३० : सीमाभागातील मोठा जनावरांचा बाजार येथील बाजार समितीत रविवारी भरतो; पण गेल्या काही वर्षांपासून आठवडा बाजारात बैलजोडीची आवक घसरत गेली. यंदा तर हंगाम संपत येऊनही एकाही बैलजोडीची आवक नोंद झालेली नाही. बैलजोडीच्या व्यवस्थापन खर्चात झालेली भरमसाट वाढ आणि शेती कामासाठी यांत्रिकीकरणाचा अधिक वापर यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.
येथील जनावरांचा आठवडा बाजारात म्हशी, शेळ्या - मेंढ्या, गाई, बैलजोडी यांची अधिक आवक असते; पण दशकभरापासून बैलजोड्यांच्या आवकेत लक्षणीय घट झाली. खासकरून कोरोनानंतर तर केवळ हातावर मोजण्याइतपत बैलजोड्या येत होत्या. सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात ऊस वाहतुकीच्या बैलगाड्यांसाठी तर मार्च-एप्रिल महिन्यात खरीप हंगामाच्या तयारीसाठी बैलांच्या बाजारात उलाढाल वाढायची. अधिकाधिक २५० तर किमान ५० बैलजोड्यांची आवक नोंदायची. त्यामुळे बाजार समितीचा आवार देखण्या बैलजोडीने फुलून जायचा. मात्र, यंदा वर्षभरात एकाही बैलजोडीची आवक झाली नाही.
बैलजोडीसाठी लागणाऱ्या वैरण आणि पशुखाद्यांच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच बैलजोडी सांभाळण्यासाठी मनुष्यबळ मिळणे मुश्किल बनले आहे. तुलनेत ट्रॅक्टरमुळे शेतातील कामे कमी खर्चात होऊ लागली आहेत. त्याचा व्यवस्थापन खर्चही बैलजोडीच्या तुलनेत कमी आहे. साहजिकच बैलजोडीपेक्षा ट्रॅक्टरनेच शेतीकाम करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. या सर्वांचा परिणाम, शेतकऱ्यांच्या गोठ्यातून सर्जा-राजाची बैलजोडी गायब होण्यात झाला. त्यामुळे जनावरांच्या बाजारातील बैलजोड्यांची आवक दुर्मिळ झाली.
--------------
बैलजोडीच्या देखभालीसाठी एक गडी कायमस्वरूपी लागतो. हा गडी मिळणे आणि सांभाळणे महागाईत दुरापास्त आहे. पूर्वी ६० रुपयाला मिळणारे पोते आज त्या रकमेत कुळथी किलोभर सुद्धा येत नसल्याने बैलजोडी बाळगणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही.
- पुंडलिक गायकवाड,
बैलजोडी पालक, गडहिंग्लज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com