पिस्तुलचा धाक

पिस्तुलचा धाक

प्रत्यक्षदर्शीला चोरट्यांकडून पिस्तुलचा धाक
गडहिंग्लजमधील प्रकार : चारचाकी वाहनातून केले पलायन

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ६ : चुलत्याच्या बंद असलेल्या घरातील लाईट का लागली आहे, हे बघण्यासाठी गेलेल्या एकाचे चोरट्यानी तोंड दाबून पिस्तुलचा धाक दाखविला आणि तिघांनीही मोटारीतून पलायन केले. एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखा हा प्रकार शहरातील अर्बन कॉलनीत आज सायंकाळी सातच्या सुमरास घडला.
याबाबतची माहिती अशी की, पाटबंधारे विभागाचे निवृत्त अधिकारी असलेले सुभाष हत्ती व पत्नी विजया हे दोघेच अर्बन कॉलनीतील बंगल्यात राहतात. त्यांचे चिरंजीव नोकरीनिमित्त बाहेर असतात. आज सकाळी हत्ती दांपत्य एका घरगुती कार्यक्रमासाठी राशिवडे (ता. राधानगरी) येथे गेले होते. जाताना त्यांनी बंगल्याला कुलूप लावून समोरच राहत असलेले पुतणे प्रा. संजय हत्ती यांच्या घरी चावी ठेऊन कार्यक्रम करून उद्या येणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, प्रा. हत्ती हे श्री काळभैरव मंदिरात दर्शन घेऊन परत येताना चुलते सुभाष यांच्या घरात लाईट लागल्याचे दिसले. चुलते उद्या येणार असे सांगितले आहे आणि घरी लाईट लागल्याने त्यांना संशय आला. त्यामुळे ते कोण आहे हे पाहण्यासाठी तेथे गेले. दरवाजाही उघडलेला दिसला. कोणीतरी आत येत असल्याचे लक्षात येताच दोघेजण बाहेर आले आणि त्यांना आत ओढून नेत होते. हत्ती यांनी जिन्याच्या लोखंडी ग्रीलला घट्ट पकडले होते. त्यामुळे त्यांना ओढून आत नेता आले नाही. त्यातील एकाने त्यांचे तोंड दाबले आणि पिस्तुल डोक्याला लावली. त्यानंतर ते तिघेही तेथून पळत समोरच लावलेल्या मोटारीतून पसार झाले. या घटनेत चोरी झाली की नाही, हे मात्र घरमालक आल्यानंतर समजणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची रात्री उशिरापर्यंत पोलिसांत नोंद सुरू होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com