
वठार तर्फे वडगावला उद्या जंगी कुस्ती मैदान
माऊली जमदाडे विरुद्ध रविकुमार - 08037
कुमार पाटील विरुद्ध प्रदीप ठाकूर - 08035
वठार तर्फ वडगावला
उद्या जंगी कुस्ती मैदान
रविकुमार, जमदाडे यांच्यात मुख्य लढत
सकाळ वृत्तसेवा
घुणकी, ता. १० : हातकणंगले तालुक्यातील वठार तर्फ वडगाव येथील उरुसानिमित्त रविवारी (ता. १२) आयोजित कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकासाठी दिल्लीच्या रविकुमार व कोल्हापूरच्या माऊली जमदाडे यांच्यात लढत होईल. चांदीची गदा व एक लाख, ११ हजार १११ रुपयांची इनामी कुस्ती आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती कोल्हापूरचा कुमार पाटील विरुद्ध प्रदीप ठाकूर (सांगली), तर तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती वारणेचा नामदेव केसरे विरुद्ध पुण्याच्या अभिजित बनसोडे यांच्यात होईल. विजेत्यांना अनुक्रमे ७७ हजार ७७७ व ३३ हजार ३३३ रुपये, तसेच चांदीची गदा मिळेल.
वठार तर्फ वडगाव येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत दावल मलिक बाबांच्या मुख्य उरुसास शनिवारी (ता. ११) प्रारंभ होत आहे. त्यानिमित्त रविवारी दुपारी चारला पाण्याच्या टाकी शेजारील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर मैदान होईल. मैदानात चौथ्या क्रमांकाची कुस्ती मोहोळचे उदय खांडेकर व शाहूपुरी तालमीचे सचिन शितोळे यांच्यात २२२२२ रुपयांसाठी होईल. उत्तेजनार्थ पाच हजारांसाठी पारगावचे शंकर माने व इस्लामपूरच्या बाबा माने यांच्यात होईल. यासह अन्य कुस्त्या आहेत. यंदा प्रथमच महिला मल्लांच्या लढती असून श्रद्धा कुंभार (बोरपाडळे) विरुद्ध आर्या सुतार (कोल्हापूर), पल्लवी कोरवी (कळे) विरुद्ध वैष्णवी जाधव (मुंबई) यांच्यात लढत आहे.
मैदानाचा प्रारंभ आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते होईल. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने, योगेश पाटणकर, हिंदकेसरी दिनानाथ सिंग उपस्थित असतील. याच दिवशी सकाळी नऊला धावणे स्पर्धा व सायकल शर्यती होतील. दरम्यान, शुक्रवारी गंधरात्र विधी झाला. शनिवार रात्री नऊला शासकीय गलेफ व शिडीचा धार्मिक विधी होईल. त्यानंतर रात्री मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत, अशी माहिती सरपंच तेजस्विनी वाठारकर, उपसरपंच राहुल पोवार व यात्रा समितीने दिली.
--------------------