भुदरगड पॅटर्न राज्यात ‘लै भारी’

भुदरगड पॅटर्न राज्यात ‘लै भारी’

Published on

बिग स्टोरी....
...................
भुदरगड पॅटर्न राज्यात ‘लै भारी’

शिष्यवृत्ती परीक्षा : जिल्हा परिषद शाळांची गरुड भरारी

धनाजी आरडे, गारगोटी
गारगोटी, ता. ३ : भुदरगड तालुका शिष्यवृत्ती परीक्षेत दरवर्षी अव्वल राहिला आहे. फेब्रुवारी २०२४ च्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत पाचवीचे ७६ व आठवीचे ८० असे एकूण १५६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले आहेत. तालुक्याने शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा बहुमान यावर्षीही कायम राखला असून भुदरगडचा ''शिष्यवृत्तीचा पॅटर्न'' आता राज्यात लै भारी ठरला आहे.
पाचवीतील आठ विद्यार्थी राज्य गुणवत्ताधारक बनले आहेत. तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी हे गौरवास्पद यश खेचून आणल्याने विद्यार्थी व शिक्षकांची गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
पाचवी शिष्यवृत्तीत २९ शाळांनी यश मिळविले. यात २६ जिल्हा परिषद शाळा, तर ३ माध्यमिक शाळा आहेत. विद्यामंदिर सोनाळी शाळेतील ११ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत १५ माध्यमिक शाळेतील ८० विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र झालेत. यात प. बा. पाटील माध्यमिक विद्यालय मुदाळचे सर्वाधिक ५५ विद्यार्थी, कुमार भवन पुष्पनगरचे ५ विद्यार्थी, गारगोटी हायस्कूलचे ४ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत.
या यशामध्ये इयत्ता पहिलीपासूनच भुदरगड प्रज्ञाशोध परीक्षेच्या माध्यमातून मुलांमध्ये स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण करून शिष्यवृत्तीचा नवा भुदरगड पॅटर्न निर्माण करणारे गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, विस्तार अधिकारी उत्तम पाटील, प्रबोध कांबळे, निवृत्ती भाटले, केंद्रप्रमुख संजय कुकडे, विठ्ठल मगदूम यांचा मोलाचा वाटा आहे.
...

* प्रज्ञाशोध ठरली दीपस्तंभ -
२०११ मध्ये तत्कालीन गटशिक्षणाधिकारी संपत गायकवाड यांच्या संकल्पनेतून भुदरगड प्रज्ञाशोध परीक्षा (बीटीएस) इयत्ता पहिली व दुसरीसाठी सुरू झाली. तसेच जिल्हा परिषदेनेही चौथीसाठी प्रज्ञाशोध परीक्षा सुरू केली आहे. या दोन्ही परीक्षांच्या तयारीमुळे पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेचा पाया आपसूकच रचला गेला. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी ''प्रज्ञाशोध'' परीक्षा दीपस्तंभ ठरली.

* शिष्यवृत्तीचे नियोजन व कार्यवाही -
भुदरगडच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या नाविन्यपूर्ण यशाचे गमक म्हणजे या परीक्षेविषयी प्रशासन व शिक्षकांनी केलेले सूक्ष्म नियोजन व त्याची काटेकोर अंमलबजावणी होय. सर्वप्रथम अंतिम परीक्षेनंतर पुढील शैक्षणिक वर्षाच्या शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात नियोजन केले जाते. शिष्यवृत्तीचे वर्ग घेणाऱ्या शिक्षकांची कार्यशाळा घेतली जाते. तालुक्यात वर्षभरात आयोजित सराव चाचण्यांकरिता आर्थिक नियोजन संदर्भाने अनेकांचे सहकार्य घेतले जाते. या सर्वांच्या मदतीतून गेले अनेक वर्षापासून ‘स्कॉलर फंड’ची निर्मिती केली गेली. त्यातूनच दर्जेदार सराव चाचण्यांची निर्मिती शासकीय प्रश्नपत्रिकेच्या धर्तीवर संचनिहाय पद्धतीने केली जाते. दानशुरांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना मोफत सराव चाचण्या पुरविल्या जातात. याचे केंद्रनिहाय नियोजन केले जाते. केंद्रस्तरावर पाच सराव चाचण्या घेऊन त्यातील २०० टॉपर विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय सराव चाचण्यांसाठी निवड केली जाते.

* यशाचे गमक -
वर्ग शिक्षकांनी केलेले ३६५ दिवसांचे काटेकोर नियोजन हेच भुदरगडच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाचे मोठे गमक मानले आहे. वर्षभर सतत उत्साहाने काम, शाळेलाच घर समजून धडपडण्याची वृत्ती, निर्धारित वेळेपेक्षाही अधिक काळ, शाळेचा व्याप आणि शिष्यवृत्तीचाच ध्यास.... विद्यार्थ्यांसाठी प्रचंड कष्टप्रियता, जिद्द व प्रसंगी स्वतःच्या घरीच विद्यार्थ्यांना त्या त्या शैक्षणिक वर्षासाठी दत्तक घेण्याची गुरुजींची मानसिकता, स्वतःच्या पैशातून शैक्षणिक साहित्याचा पुरवठा. निर्धारित वेळेत ते शालेय अभ्यासक्रम, अध्यापन करतात आणि सकाळ, संध्याकाळ जादा तास घेऊन शिष्यवृत्तीचे मार्गदर्शन करतात. सराव प्रश्नपत्रिका, प्रश्नावली, स्वाध्याय झपाटल्यासारखे विद्यार्थ्याकडून सोडवून घेतात.
......

वर्षनिहाय विद्यार्थी संख्या
*वर्ष* *शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी*
२००९ - १३८
२०१० - १४४
२०११ - १६१
२०१२ - १८५
२०१३ - १६८
२०१४ - १६९
२०१५ - १४५
२०१७ - १३८
२०१८ - १३१
२०१९ - १५२
२०२० - १५५
२०२१ - १७७
२०२२ - १५४
२०२३ - १३२
२०२४ - १५६
.............
कोट...
ॲकॅडमी संस्कृती वाढत आहे. अशा कठीण स्पर्धेच्या काळात प्राथमिक शिक्षक, विद्यार्थ्यांनी स्वकष्टाने मिळविलेले हे यश सर्वच स्तरांतील विद्यार्थी - पालकांची पावले जिल्हा परिषद शाळांकडे वळविणार आहेत. जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्ता आणि दर्जा विश्वासार्हता वाढविणारी आहे.
- दीपक मेंगाणे,
गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, भुदरगड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.