भुयारी रेलवे मार्गाचे काम दिड वर्षानंतरही अर्थवट अवस्थेत टाकून ठेकेदार गायब.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भुयारी रेलवे मार्गाचे काम दिड वर्षानंतरही अर्थवट अवस्थेत टाकून ठेकेदार गायब..
भुयारी रेलवे मार्गाचे काम दिड वर्षानंतरही अर्थवट अवस्थेत टाकून ठेकेदार गायब..

भुयारी रेलवे मार्गाचे काम दिड वर्षानंतरही अर्थवट अवस्थेत टाकून ठेकेदार गायब..

sakal_logo
By

03043
हातकणंगले : संरक्षक भिंतीतून बाहेर आलेला मातीचा भराव, त्यावर उभा असलेला महावितरणचा धोकादायक खांब.


हातकणंगले-इचलकरंजी मार्गावरील
भुयारी रेल्वे मार्गाचे काम ठप्प
दीड वर्षानंतरही प्रतीक्षा; नागरिक आंदोलनाच्या तयारीत
अतुल मंडपे : सकाळ वृत्तसेवा
हातकणंगले, ता. २४ : हातकणंगले-इचलकरंजी मार्गावरील भुयारी रेल्वे मार्गाचे काम अर्धवटच ठेवून ठेकेदार काम सोडून गेला आहे. यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांचे हाल होत असून वाहनांच्या नुकसानी बरोबरच अनेकांना कंबरदुखी आणि पाठदुखीचा त्रास सुरू झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर त्रस्त झालेले नागरिक थेट रेल्वे मार्ग रोखण्याच्या तयारीत आहेत.
कोल्हापूर- मिरज रेल्वे मार्गावर हातकणंगले येथे गेट क्रमांक १७ येथे रेल्वेचे गेट होते. मात्र वाहतुकीची कोंडी होत असल्याने या ठिकाणी भुयारी रेल्वे पूल बांधण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. नोव्हेंबर २०२१ मध्ये कामाला सुरूवात झाली. मार्च २२ पर्यंत काम करण्याची मुदत होती, मात्र दीड वर्ष झाले तरी काम अर्धवट स्थितीत आहे.
भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंत बांधली आहे, मात्र यातील पश्चिमेच्या बाजूला त्या संरक्षक भिंतीतूनच मातीचा भराव बाहेर आला आहे. त्यावरच महावितरणचा पोल धोकादायक स्थितीत उभा आहे. तो वाहनधारकांसाठी धोक्याचा आहे. रस्त्यांत खड्डे पडले असून त्यात गटारीचे पाणी साचले आहे. वाहनधारकांना त्यातूनच मार्ग काढावा लागतो त्यामुळे वाहनांचे नुकसान होत असून कंबरदुखी, मणके, पाठदुखीनेही अनेक जण त्रस्त आहेत.
पावसाळ्यात येथे जवळपास पंधरा ते सतरा फूट पाणी दिवसेंदिवस साचून होते. आंदोलने, निदर्शने करूनही काम झालेले नाही. नागरिकांचा उद्रेक पाहून खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी करून तत्काळ काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यावेळी डिसेंबरपर्यंत सर्व काम पूर्ण करण्याचा शब्द दिला होता. मात्र अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही.
----------------
कोट..
अनेक वेळा सूचना देऊनही रेल्वे प्रशासन व ठेकेदाराने काम पूर्ण केलेले नाही. आता, तर काम अर्धवटच सोडून ठेकेदार गायब आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पंधरा दिवसांत काम व्यवस्थित पूर्ण केले नाही, तर सर्वांना घेऊन थेट रेल्वे मार्गच रोकला जाईल.
- अरुणकुमार जानवेकर, नगराध्यक्ष, हातकणंगले
------------
कोट
मुदत संपूनही एक वर्ष उलटले आहे. कंत्राटदाराचा मंजूर फंड संपला आहे, तरीही उर्वरित कामांपैकी महत्त्‍वाची कामे या कंत्राटदारांकडून करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उर्वरीत कामे दुसऱ्या कंत्राटदारांकडून घेतली जातील. पाण्याचा निचरा कायमस्वरूपी केल्याशिवाय कंत्राटदाराचे बिल दिले जाणार नाही.
- निशिकांत शिंदे, कनिष्ठ अभियंता, रेल्वे, प्रशासन