
साहित्य नसतानांच बिल अदा.. हातकणंगले नगरपंचायतीमधील प्रकार उघडकीस महिला नगरसेविका व उपनगरांध्यक्षांमध्ये जुंपली
हातकणंगलेत उपनगराध्यक्ष- नगरसेविकांत वादावादी
खेळण्याच्या साहित्यासाठी आलेल्या निधीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप
हातकणंगले ता. २५ ः शहरात खेळण्याच्या साहित्यासाठी आलेल्या निधीपैकी काही साहित्याची खरेदी न करताच थेट बिले काढल्याने याची माहिती घेण्यासाठी नगरपंचायतीत गेलेल्या नगरसेविका रोहिणी खोत यांना अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला. ज्यांच्या प्रभागात हे साहित्य बसवल्याचे दाखविले आहे ते उपनगराध्यक्ष केतन कांबळे यांनी माझ्या प्रभागात झालेल्या कामांची चौकशी तुम्ही का करता असे म्हणत दोघांत वादावादी झाली.
बालकल्याण व शिक्षण विभागाकडून खेळण्याच्या साहित्यासाठी निधी नगरपंचायतिस प्राप्त झाला होता. यातून शहरातील प्र.क्र.४ मधील शाहूनगर या परिसरात खेळाचे साहित्य बसविले आहे. मात्र, प्रत्यक्षात एवढा निधी मंजूर नसतानाही ७ लाख ७५ हजारांची बिले काढली आहेत. यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत नगरसेविका रोहिणी खोत यांनी प्रशासनाकडे माहिती मागीतली. मात्र प्रशासनाकडून माहिती देण्यासाठी टाळाटाळ केली. दुसऱ्या दिवशी माहिती मिळाल्यानंतर संबंधित कागदपत्रातून टेंडर भरलेल्या १८ जणांचे खेळण्यांचे दरपत्रकच गायब असल्याचे खोत यांना निदर्शनास आले. त्यामुळे खोत यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
कोट..
झालेला प्रकार निंदनीय आहे. माहिला नगरसेविकांना दिली जाणारी वागणूक चुकीची असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार आहे.
-अरूणकुमार जानवेकर, नगराध्यक्ष
कोट..
कंत्राटदाराने साहित्य खरेदी केलेले आहे. मात्र, उदघाटनांसाठी ते साहित्य बसवलेले नाही. कदाचित संबंधित लोकप्रतिनिधींना याबाबतची माहिती नसेल.
-विशाल पाटील, मुख्याधिकारी, नगरपंचायत