
पिण्याच्या पाण्यासाठी अनवाणी कावड मोर्चा
02356
रेंदाळ : दूधगंगा नदीत पाणी सोडून पाणी टंचाई दूर करण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य महेश कोरवी यांनी खांद्यावर कावड घेऊन रणरणत्या उन्हात अनवाणी पायांनी मोर्चा काढला.
------------
पिण्याच्या पाण्यासाठी अनवाणी कावड मोर्चा
रेंदाळचे ग्रामपंचायत सदस्य महेश कोरवी यांचे आंदोलन; प्रशासनाकडून दखल
हुपरी, ता. ८ : दूधगंगा नदी पात्रातील पाणी पातळी खालावल्याने पाणी उपसा केंद्र उघडे पडले आहे. परिणामी रेंदाळ येथे पाणी टंचाईचे संकट निर्माण झाल्याने नदीत पाणी सोडावे या मागणीसाठी रेंदाळचे ग्रामपंचायत सदस्य महेश कोरवी यांनी खांद्यावर कावड घेऊन उन्हात अनवाणी पायी चालत कोल्हापूर येथिल जलसिंचन कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.
दरम्यान, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनाची दखल घेत नदीत तत्काळ पाणी सोडण्याचे आश्वासन तर दिलेच शिवाय भर उन्हात चालत आल्याचे पाहून त्यांची शासकीय मोटारीतून गावी पाठवणी करून संवेदनशीलता जपली. अधिकाऱ्यांच्या या कृतीचे कौतूक होत आहे.
रेंदाळला सुळकुड येथील दूधगंगा नदी योजनेतून पाणी पुरवठा होतो. उन्हाळ्याच्या नदी पात्रातील पाण्याची पातळी खाली गेली आहे. पाटबंधारे विभागाने धरणातून पाणी सोडलेले नाही. अशातच पावसानेही ओढ दिल्याने पात्रातील इंटकवेल पाण्याअभावी उघडे पडले आहे. त्यामुळे रेंदाळचा पाणी पुरवठा आठ दिवसांपासून ठप्प आहे. त्यामुळे कोरवी यांनी रेंदाळमधून कोल्हापूर येथील जलसिंचन कार्यालयावर तीस किलोमीटर अनवाणी चालत खांद्यावर कावड आणि तिला घागरी अडकवून मोर्चा काढला. कार्यकारी अभियंता श्री. बांदिवडेकर यांनी नदीत पाणी सोडण्याची कार्यवाही तत्काळ करत असल्याचे सांगितले.