हातकणंगलेकडून दुसऱ्यांदा खासदार मानेंची पाठराखण

हातकणंगलेकडून दुसऱ्यांदा खासदार मानेंची पाठराखण

हातकणंगलेकडून दुसऱ्यांदा खासदार मानेंची पाठराखण
कोरे, यड्रावकर, आवाडे, घाटगेंची राबली यंत्रणा ः बालेकिल्ल्यातच शेट्टींना दणका
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ५ : इचलकरंजी शहरासह हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील मतदारांनी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना साथ दिली. त्यामुळे त्यांचा विजय अधिक सुखर झाला. विशेषत: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला असलेल्या शिरोळ तालुक्यात माने यांना मिळालेले मताधिक्य चर्चेचे ठरले. कोणताही बडा नेता पाठीशी नसताना हातकणंगले तालुक्याने सलग दुसऱ्यांदा माने यांचीच पाठराखण केली.
खासदार माने यांना शिराळा व इस्लामपूर विधानसभा क्षेत्रातून मते मिळवताना मोठी दमछाक होईल, असे वाटत होते. पण महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना अपेक्षित आघाडी मिळाली नाही. त्यामुळेही माने यांचा विजय सोपा होत गेला. गेल्या निवडणुकीत शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यातून माने यांना मोठे मताधिक्य मिळाले होते. पण या निवडणुकीत तेथील मतदारांना स्थानिक उमेदवार असल्यामुळे त्यांनी सत्यजित पाटील-सरुडकर यांच्यावर मतांचा वर्षाव केला. येथे माने यांच्यासाठी आमदार विनय कोरे यांनी प्रभावी प्रचार यंत्रणा राबवली. त्यानंतरही सरुडकरांनी घेतलेली मते लक्षणीय आहेत. त्यामुळे तेथील मतदारांनी स्थानिक उमेदवाराला पसंती दिल्याचे सिद्ध झाले.
वास्तविक शिरोळ मतदारसंघातून शेतकरी नेते राजू शेट्टी यांना मताधिक्य अपेक्षित होते. पण शिरोळ तालुक्यात माने यांना मतदारांनी चांगली आघाडी देत सर्वांनाच धक्का दिला. आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर व माधवराव घाटगे यांची भूमिका माने यांच्या विजयासाठी महत्त्‍वपूर्ण ठरली.
-------
आवाडेंच्या साथीमुळे मोठे मताधिक्य
गेल्यावेळी माने यांच्या विजयात इचलकरंजी शहराने तब्बल ७५ हजारांचे मताधिक्य देऊन मोठी साथ दिली होती. यावेळीही शहरातील मतदार माने यांच्याच पाठीशी भक्कमपण उभारले. त्यामुळे त्यांचा विजय अधिक सोपा झाला. आमदार प्रकाश आवाडे यांची साथ मिळाल्यामुळे मोठे मताधिक्य घेता आले. त्यांनी आपली दाखल केलेली उमेदवारी मागे घेतली नसती तर मत विभागणीचा फटका माने यांना बसला असता. पण आवाडे यांनी माने यांच्या प्रचारात आघाडी घेत मताधिक्य मिळवून दिले. आवाडे सोबत नसते तर वेगळे चित्र पहावयास मिळाले असते. याशिवाय हातकणंगले तालुक्याने मोठी साथ दिली. विरोधात एक विद्यमान व दोन माजी आमदार एकत्र आले असले तरीही त्यांच्या शब्दाला मतदारांनी जुमानले नसल्याचे मतांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com