अस्थायी पदांचा प्रश्न रखडला

अस्थायी पदांचा प्रश्न रखडला
Published on

‘आयजीएम’मधील अस्थायी पदांचा प्रश्न रखडला
वेतन थकण्याची समस्या; आरोग्यमंत्र्यांकडून प्रक्रियेस गती मिळण्याची अपेक्षा

संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी, ता. ४ ः शहराला शासकीय आरोग्यसेवा देणाऱ्या इंदिरा गांधी सामान्य (आयजीएम) रुग्णालयातील अस्थायी पदे स्थायी करण्याचा प्रस्ताव चार वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित आहे. यामुळे सुमारे १७४ कर्मचाऱ्यांना दरवर्षी दोन ते तीन महिने वेतनासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र समोर येत आहे. रुग्णालयातील कर्मचारी अस्थायी स्वरूपात कार्यरत आहेत. त्यांच्या पदांचा कालावधी दर सहा महिन्यांनी फेब्रुवारी आणि ऑगस्टमध्ये संपतो. कालावधीवाढीसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविणे आवश्यक असते. मात्र मंजुरीस होणारा विलंब कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखीचा विषय ठरत आहे. परिणामी कर्मचारी पदे स्थायी होण्याची प्रतीक्षा करीत आहेत.
आयजीएम रुग्णालयाकडून वारंवार प्रस्ताव पाठवूनही वरिष्ठ कार्यालयाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. सध्या रुग्णालयात मंजूर २१८ पदांपैकी सर्व पदे अद्याप अस्थायी आहेत. यापैकी केवळ १७४ कर्मचारी सध्या कार्यरत आहेत.रुग्णालय प्रशासनाने यापूर्वी अनेकवेळा पदे स्थायी करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. शासनाच्या नियमानुसार पाच वर्षांच्या सेवेनंतर ८० टक्के पदे स्थायी करण्यास पात्र ठरतात. आयजीएम रुग्णालय २७ फेब्रुवारी २०१७ रोजी इचलकरंजी पालिकेकडून शासनाकडे हस्तांतरित झाले आहे. या प्रक्रियेला ९ वर्षांहून अधिक कालावधी लोटला आहे. तरीही पदे स्थायी न झाल्याने कर्मचाऱ्यांत नाराजी आहे. दरम्यान रुग्णालयाला अलीकडेच ३०० खाटांची मंजुरी मिळाल्याने आणखी १५४ कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधाला मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे. या नव्या कर्मचाऱ्यांनाही पुढील काही वर्षे अस्थायी स्वरूपातच काम करावे लागणार आहे.
जिल्ह्यातील सीपीआरनंतरचे मोठे शासकीय रुग्णालय म्हणून आयजीएमकडे पाहिले जाते. अशा महत्त्वाच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित राहणे ही चिंतेची बाब आहे. आरोग्यमंत्री जिल्ह्यातील असल्याने हा प्रश्न लवकर मार्गी लागेल; अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र अद्याप ठोस कार्यवाही न झाल्याने कर्मचाऱ्यांना प्रतीक्षाच करावी लागत आहे. अस्थायी पदे स्थायी करण्याचा निर्णय तातडीने घेऊन कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवावयात अशी मागणी जोर धरू लागली आहे.

--------------------

चौकट :कर्मचारी संख्या दृष्टीक्षेप
गट* मंजूर पदे* भरलेली पदे* रिक्त पदे
अ वर्ग-१*१८*८*१०
अ वर्ग-२* २८*२८*०
ब वर्ग* २*१*१
शूश्रुषा क वर्ग*९५*८०*१५
तांत्रिक क वर्ग *२७*२४*३
कार्यालयीन क वर्ग *१०*९*१
चार वर्ग * ३८*२४*१४
एकूण * २१८*१७४*४४
-----------------

कोट:
वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पुढील आदेशाची प्रतीक्षा आहे.
- डॉ. संतोष पोळ, वैद्यकीय अधीक्षक आयजीएम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com