

03333
इचलकरंजी : येथे उन्हाळी सुट्यांमुळे जलतरण तलावात पोहायला शिकणाऱ्या मुलांची संख्या वाढली आहे.
-
पोहण्याचा आनंद घ्या, पण जीवाला जपा
योग्य प्रशिक्षकांकडून धडे घ्या; पालकांची सतर्कता आवश्यक
संदीप जगताप: सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २६ : उन्हाळी सुरू सुट्या होताच अभ्यासातून मुक्त झालेली मुले विविध खेळ, भटकंती आणि नव्या कौशल्यांच्या शोध घेताना दिसत आहेत, यामध्ये मुलांचा कल पोहण्याकडे असल्याचे दिसून येतो. एप्रिल ते मे या कालावधीत ग्रामीणसह शहरी भागात विहिरी, तलाव किंवा नद्यांकडे मुलांची वर्दळ वाढलेली पाहायला मिळते. ही एक सकारात्मक बाब असली, तरी काही गंभीर धोकेही आहेत. या काळात पोहताना अपघात होण्याच्या घटना वाढत असल्याने खबरदारी घेणे आवश्यक आहे.
मित्रांच्या सहवासात आनंद आणि उत्सुकतेच्या भरात अनेक मुले प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाविना पोहण्याचा प्रयत्न करतात. काही मुले ट्यूब, प्लास्टिक कॅन किंवा इतर अपुऱ्या आणि असुरक्षित साधनांचा आधार घेत पाण्यात उतरतात. अशा प्रकारच्या साधनांवर अवलंबून राहणे धोकादायक असल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण होते. दरम्यान, पोहणे हे केवळ कौशल्य नसून ती एक जीवनरक्षक कला आहे. मात्र या कलेचे प्रशिक्षण योग्य पद्धतीने, सुरक्षित वातावरणात आणि अनुभवी प्रशिक्षकांच्या देखरेखीत होणे आवश्यक आहे. यापूर्वी घडलेल्या अपघातांच्या घटनांत निष्काळजीपणा आणि अज्ञान असल्याचे दिसून आले आहे. खोल पाण्याचा अंदाज नसणे, प्रवाहाचा अंदाज न येणे, पाण्यात अचानक घाबरल्यामुळे नियंत्रण सुटणे या गोष्टी जीवघेण्या ठरू शकतात.
या पार्श्वभूमीवर पालकांची भूमिका महत्त्वाची ठरते. मुलांना पोहायला शिकण्यास प्रोत्साहन देताना त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करणे ही जबाबदारी आहे. मुले कुठे, कोणासोबत आणि कोणत्या परिस्थितीत पोहायला जातात, यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्यांना पाण्याशी संबंधित धोके आणि सुरक्षेचे नियम समजावून सांगणे गरजेचे आहे.
पोहण्यास शिकणे हे आवश्यक असले तरी त्यासोबत सुरक्षिततेचे भान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य प्रशिक्षण, आवश्यक साधनसामग्री यांच्या माध्यमातूनच मुलांची सुरक्षितता अबाधित राहू शकते.
--------------
दृष्टिक्षेपात
-इचलकरंजीत महापालिकेचे दोन जलतरण तलाव
-शहीद भगतसिंग जलतरण तलाव
-शंकरराव पुजारी जलतरण तलाव
-भगतसिंग जलतरण तलाव सध्या बंद आहे
-पुजारी जलतरण तलावाची रचना ही स्पर्धकांना डोळ्यासमोर ठेवून केली आहे
-एकच जलतरण तलाव सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे
---------------
...हे करणे गरजेचे
-उन्हाळ्याच्या काळात नदी, विहिरी येथे गांभीर्याने पाहण्याची गरज
-स्थानिक प्रशासन आणि ग्रामपंचायतींनीही याकडे गांभीर्याने पाहावे
-सुरक्षित पोहण्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे
-प्रशिक्षित जीवनरक्षकांची नियुक्ती करणे
-धोकादायक ठिकाणी इशारे आणि बंदीची चिन्हे लावणे
---------------------
कोट :
पोहण्यापूर्वी योग्य प्रशिक्षण, शारीरिक क्षमता आणि पाण्याच्या परिस्थितीची माहिती असणे आवश्यक आहे. आपल्या सुरक्षिततेचे नियम पाळणे हे पोहण्याच्या कौशल्याइतकेच महत्त्वाचे आहे. आपत्कालीन परिस्थितीत कसे वागावे, याचे ज्ञान गरजेचे आहे. योग्य मार्गदर्शन आणि सतर्कता यामुळे अपघात टाळता येतात.
- उदयसिंह निंबाळकर, जलतरण प्रशिक्षक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.