

915
रोहिणी देवबा
...................
‘सुवर्ण’कन्या रोहिणी देवबाच्या
कुटुंबीयांसमोर आर्थिक आव्हान
युरोपमध्ये होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड
संदीप शिरगुप्पे ः सकाळ वृत्तसेवा
पट्टणकोडोली, ता. २६ : आशियाई कुस्ती स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकून देशाचा तिरंगा फडकवणारी पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील रोहिणी देवबा आता जागतिक स्पर्धेच्या उंबरठ्यावर उभी आहे. मात्र, तिच्या यशामागील संघर्ष अजूनही संपलेला नाही. युरोपमध्ये होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी तिची निवड झाली असली, तरी गरिबी आणि वाढत्या खर्चाच्या आव्हानांशी झुंज देत ती जागतिक मंचावर झेप घेण्यासाठी तयारी करत आहे.
वडील खानदेव देवबा शेतमजुरी करून बकरी सांभाळतात. रोहिणीला आशियाई स्पर्धेसाठी परदेशात पाठविताना त्यांनी बकरी विकून विमानाच्या तिकिटाची व्यवस्था केली. प्रशिक्षक संदीप पाटील यांनीही कुस्ती संकुलाचे शुल्क माफ करून तिच्या सरावाला बळ दिले. अशा संघर्षमय परिस्थितीवर मात करत रोहिणीने आशियाई स्पर्धेत दोनवेळा सुवर्णपदक पटकावले.
स्पर्धेदरम्यान तिचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा १०० ग्रॅम जास्त भरत असल्याचे समोर आले. अशावेळी तिने कोणताही विचार न करता केस कापून वजन कमी केले. त्यानंतर हरियाणाच्या नऊ महिला पैलवानांना पराभूत करून महाराष्ट्रासाठी सुवर्णपदक पटकावले. आता युरोपमध्ये होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. मात्र, या स्पर्धेसाठी लागणारा मोठा खर्च पेलणे तिच्या कुटुंबीयांसमोर मोठे आव्हान आहे.
..............
कोट...
रोहिणीसाठी सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दोन लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली. मेहनत, चिकाटी आणि जिद्द पाहता युरोपमधील जागतिक कुस्ती स्पर्धेत ती निश्चितच यश मिळवेल, यात शंका नाही.
- संदीप पाटील, रोहिणीचे प्रशिक्षक
.....
कोट...
रोहिणीच्या स्वप्नांच्या आड कधी गरीब परिस्थिती आणली नाही. मुलीने देशासाठी सुवर्णपदक जिंकून दिल्याने आमच्या कष्टाचे चीज केले. तिने युरोपमध्येही भारताचा तिरंगा फडकवावा आणि ऑलिंपिकमध्ये खेळावे.
- खानदेव देवबा, रोहिणीचे वडील
..............
दृष्टिक्षेपात
२७ जुलै २०२६ रोजी युरोपमध्ये होणार स्पर्धा
दौऱ्यातील सरावासाठी अंदाजे चार लाख खर्च
आतापर्यंत दोन ते अडीच लाखांची मदत
दिल्लीत तयारीसाठी दोन दिवसांत होणार रवाना
पट्टणकोडोलीत बाजीराव बाणदार यांच्याकडून प्रशिक्षण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.