लाच कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लाच कारवाई
लाच कारवाई

लाच कारवाई

sakal_logo
By

कबनूर येथे महावितरणचा कंत्राटी
कर्मचारी लाच घेताना जाळ्यात
इचलकरंजी, ता. १३ : कबनूर (ता. हातकणंगले) येथील महावितरण कर्मचाऱ्याला ३०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. रोहित आनंदा खोत (वय २५, रा. तारदाळ, ता.हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. घरगुती वीजजोडणीसाठी सर्व्हे फॉर्म पुढे पास करण्यासाठी त्याने लाचेची मागणी केली होती. त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असून, कारवाईची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती विभागाचे पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे यांनी दिली.
लाचलुचपत विभागाने दिलेली माहिती अशी, रोहित खोत गेल्या दोन वर्षांपासून महावितरणच्या कबनूर कार्यालयात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. नवीन विद्युत कनेक्शन देण्यापूर्वी वीजजोडणीचा सर्व्हे करण्याचे काम तो करतो. भागातील एका वीजग्राहकाच्या घरातील वीज जोडणीसाठी सर्व्हे फॉर्म लवकर पुढे पास करून देण्यासाठी त्याने तक्रारदाराकडे ३०० रुपयांची लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पथकाने आज दुपारी दोन वाजल्यापासून कबनूर महावितरण कार्यालय परिसरात सापळा रचला. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कार्यालयाच्या प्रवेद्वाराजवळ खोत हा तक्रारदाराकडून ३०० रुपयांची लाच स्वीकारताना सापडला.
रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती. दरम्यान, खोत याच्या तारदाळ येथील राहत्या घराची झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईत पोलिस निरीक्षक नितीन कुंभार, सहायक पोलिस निरीक्षक संजीव बंबरगेकर, विकास माने, रुपेश माने, मयूर देसाई, विष्णू गुरव आदी सहभागी झाले.
----------