
सुधारित अत्याचार
लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन
मुलीवर अत्याचार,‘पोक्सो’चा गुन्हा
इचलकरंजी, ता.२१ : वारंवार केलेल्या लैंगिक शोषणातून एका अल्पवयीन मुलीला गर्भधारणा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध बलात्कार, पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेला संशयित आरोपी हा अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करून त्याची बालसुधारगृहात रवानगी केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित मुलगी व संशयित आरोपीची एका कार्यक्रमात ओळख झाली. त्यानंतर त्याने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिच्याशी ओळख वाढवली. तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्याने पीडित मुलीचे वारंवार लैंगिक शोषण केले. या प्रकाराची वाच्यता केल्यास तिला मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडिताने याबाबत कुणाला काहीही सांगितले नाही. दरम्यान, पीडितेची प्रकृती बिघडली. त्यामुळे ती आईसोबत एका रुग्णालयात गेली. तपासणीनंतर डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याचे सांगितले. त्यानंतर पीडितेने आईसह शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी अल्पवयीन संशयित आरोपीच्या विरोधात बलात्कार, जिवे मारण्याची धमकी व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन सुधारगृहात पाठविले आहे.